श्रेयसची तुफान खेळी
। धर्मशाला । वृत्तसंस्था ।
श्रेयस अय्यरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर तिसर्या टी-20 सामन्यात सहा विकेट्सनी सहज विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 147 धावांचे आव्हान दिले होते. भारताने विजयाचे लक्ष्य 16.5 षटकांत पार केले. भारताचा टी-20 मधील हा सलग 12वा विजय ठरला. टीम इंडियाने टी-20मधील सलग विजयाच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.
तिसर्या टी-20 लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा दुसर्या षटकात 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरने सलामीवीर संजू सॅमसनसह 45 धावांची भागिदारी केली. संजू 12 चेंडूत 18 धावा करून माघारी गेला. त्याच्या जागी आलेल्या दीपक हुड्डाने श्रेयससह संघाला शतकाच्या जवळ नेले. ही जोडी विजय मिळवून देईल असे वाटत असताना दीपक 21 धावांवर बाद झाला. तर वेंकटेश अय्यर देखील 5 धावांवर परतला. वेंकटेश बाद झाला तेव्हा भारताने 103 धावा केल्या होत्या.
मैदानावर आलेल्या रविंद्र जडेजाने श्रेयससह पाचव्या विकेटसाठी नाबाद भागिदारी करून संघाला 17व्या षटकात विजय मिळवून दिला. श्रेयसने 45 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 73 तर रविंद्र जडेजाने 15 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या. श्रेयसने या मालिकेत सलग 3 अर्धशतक केली. त्याने पहिल्या सामन्यात नाबाद 57, दुसर्या सामन्यात नाबाद 74 तर तिसर्या सामन्यात नाबाद 73 धावा केल्या.