आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी

पदकतक्त्यात पहिल्यांदाच टॉप-5 मध्ये स्थान

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताने यंदा प्रथमच पदकांचे शतक पूर्ण केले. एकूण 107 पदकांची लयलूट करीत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली. तब्बल 37 वर्षांनंतर पदकतक्त्यात भारताने टॉप-5मध्ये स्थान मिळविले. चीन, जपान व दक्षिण कोरियानंतर भारत चौथ्या स्थानावर राहिला.

यजमान चीनने यंदाच्या आशियाई स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवित 201 सुवर्ण, 111 रौप्य व 71 कांस्य अशी एकूण 383 पदकांची लयलूट केली. भारताने ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) यंदाच्या आशियाई स्पर्धेत शंभर पदकांचे लक्ष्य ठेवले होते. ‌‘आयओए’च्या अध्यक्षा पी.टी. उषा यांनी ‌‘इस बार, सौ पार’चा नारा दिला होता. 653 खेळाडूंच्या पथकाने आशियाई स्पर्धेतील पदकांच्या शतकाचे स्वप्न सत्यात उतरवले. 2018च्या मागील आशियाई स्पर्धेत भारताने 70 पदकांची कमाई केली होती. यावेळी भारतीय खेळाडूंनी यात आणखी 37 पदकांची भर घालत आपला पदकांचा विक्रम आणखी मोठा केला.

नवी दिल्ली येथे 1951 मध्ये प्रथमच झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 15 सुवर्णपदके जिंकत पदकतक्त्यात दुसरे स्थान मिळविले होते, मात्र 15 सुवर्णपदकांचा आपला विक्रम मोडण्यासाठी भारताला तब्बल 68 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. 2018 मध्ये भारताने 16 सुवर्णपदके जिंकून नवा विक्रम प्रस्थापित केला, मात्र पाचच वर्षांत भारतीय खेळाडूंनी हा विक्रम 28 सुवर्णपदकांपर्यंत नेला.

महिलांनी जिंकली 46 पदके
या स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनी जवळपास पुरुषांच्या बरोबरीने पदकांची कमाई केली. मिळालेल्या 107 पदकांपैकी 46 पदके ही महिला खेळाडूंनी जिंकली, तर 51 पदके पुरुष खेळाडूंनी जिंकली. 9 पदके ही मिश्र दुहेरीतही मिळाली. म्हणजेच, यंदाच्या आशियाई स्पर्धेतील ऐतिहासिक यशात पुरुष व महिला खेळाडूंनी बरोबरीचा वाटा उचलला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ॲथलेटिक्समध्ये सरस कामगिरी
या स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी ऐतिहासिक कामगिरी करताना सर्वाधिक 7 सुवर्णपदके जिंकली. नेमबाजीच्या पदकतक्त्यात चीननंतर भारत दुसऱ्या स्थानी राहिला. भारतीय नेमबाजांनी दोहातील 2006च्या आशियाई स्पर्धेतील आपला विक्रम यंदा मोडला. त्यावेळी भारतय नेमबाजांनी 3 सुवर्ण, 5 रौप्य व 6 कांस्यपदके जिंकली होती. यावेळी नेमबाजीत भारतला 7 सुवर्ण, 9 रौप्य व 6 कांस्यपदके मिळाली. ॲथलेटिक्समध्ये नेहमीप्रमाणे यंदाही अधिक पदके मिळाली. यात 6 सुवर्ण, 14 रौप्य व 9 कांस्यपदकांचा समावेश आहे. तिरंदाजीमध्येही हिंदुस्थानने 5 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्यपदकांची कमाई केली.
22 खेळांमध्ये पदकांवर मोहोर
भारतीय खेळाडूंनी यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 22 क्रीडा प्रकारात पदकांची कमाई केली. यात 10 क्रीडा प्रकारात आपल्याला सुवर्णपदके मिळाली. हॉकी, घोडेस्वारी, टेनिस व बॅडमिंटन या खेळातही एक-एक सुवर्णपदक मिळाले. कबड्डी व क्रिकेटमध्ये पुरुष व महिला संघांनी ‌‘सोनेरी' यश संपादन केले. याचबरोबर स्क्वॉशमध्येही 2 सुवर्ण मिळाले. नेमबाजी, ॲथलेटिक्स व तिरंदाजीतही भारतीय खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे सरस कामगिरी केली.
Exit mobile version