| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
भारत विश्वविजेता होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 19 नोव्हेंबरला खेळणार आहे. या महामुकाबल्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. क्रिकेट जगतात सहा वेळा जगज्जेते बनण्याचा आस्ट्रेलियाचा अश्वमेध रोखून भारताला तिसऱ्यांदा विश्वकरंडक जिंकण्यासाठी कसोटी पणाला लावावी लागणार आहे. यंदाच्या विश्वचषकात अपराजित असणाऱ्या भारतीय संघाला आपल्या कामगिरीत सातत्य विजय मिळवून देणार आहे. यामुळे रोहित सेनेने आस्ट्रेलियाचा पराभव करण्यासाठी कोणती रणनीती आखली आहे हे रविवारी होणाऱ्या महामुकाबल्यामध्ये पाहावयास मिळणार आहे.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. भारतीय संघाला विश्वचषक जिंकून 12 वर्षांची प्रतीक्षा संपवण्याची संधी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. भारताने कपिलदेवच्या नेतृत्वाखाली 1983 मध्ये विश्वचषक जिंकला त्यानंतर 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वात विश्वकरंडक जिंकला होता. तर ऑस्ट्रेलियाने मायकल क्लार्कच्या कॅप्टन्सीत वर्ल्ड कप उंचावला होता. या महाअंतिम सामन्यानिमित्ताने विजयाच्या आलेखावर नजर टाकली तर ऑस्ट्रेलिया संघ वरचढ राहिला आहे. रविवारी अहमदाबाद येथील भारत-ऑस्ट्रेलिया यांचा विश्वचषकामधील 151 वा सामना असणार आहे. याआधी दोन्ही संघ 150 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारताला सर्वाधिक सामन्यात पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर 83 सामन्यांमध्ये मात केली आहे. तर भारताने ऑस्ट्रेलियाला 57 सामन्यांमध्ये पराभूत केले आहे. दोन्ही संघांमधील 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या विश्वचषकातील अंतिम लढतीची उत्सुकता सर्वांना लागली आहे. एका बाजूला स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आणि दुसऱ्या बाजूला पाच वेळा विजेता झालेला संघ अशा अव्वल संघांमध्ये ही लढत होत आहे. उत्साहाला अपेक्षांची झालरविश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादचा भव्यदिव्य रंगमंच नटून थटून तयार आहे. अवकाश पडदा उघडण्याचा, परंतु त्या अगोदरच संपूर्ण अहमदाबाद शहरात कमालीचा उत्साह संचारला आहे. ‘चलो अहमदाबाद’ असा नारा देत असंख्य क्रिकेटप्रेमींनी अंतिम सामन्यास येण्याची तयारी सुरु केली आणि बघत बघता शुक्रवारीच हे शहर जवळपास हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र निर्माण झाले. एक लाख 32 हजार क्षमता असलेल्या या स्टेडियमची तिकीटविक्री कधीच संपलेली आहे. तरीही येथील अनेक स्थानिकांनीही आशा सोडलेली नाही.
भारतीय संघातील मोजके खेळाडू हलक्या सरावासाठी आज मैदानात आले. तर कोलकत्याहून अहमदाबादमध्ये आलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टेडियममध्ये आलेच नाहीत. तरीही स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उत्साही प्रेक्षकांचा गलका वाढतच होता. त्यात भर होती पोलिसांची. 10 ते 15 हजार पोलिस आजपासूनच स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत.