रांचीत राहुल-रोहितचे राज्य, पदार्पणात हर्षल सामनावीर
। मुंबई । वृत्तसंस्था ।
न्यूझीलंडने दिलेले 154 धावांचे लक्ष्य भारताने 17.2 षटकांत गाठून तीन लढतींच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलने (2/25) पदार्पणाच्या लढतीत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला़ त्यानंतर सलामीवीर के. एल. राहुल (49 चेंडूंत 65 धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा (36 चेंडूंत 55 धावा) यांनी शतकी भागीदारी रचल्यामुळे भारताने दुसर्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा सात गडी आणि 16 चेंडू राखून धुव्वा उडवला.उभय संघातील तिसरा सामना रविवारी कोलकाता येथे होणार आहे़
राहुल आणि रोहित यांनी सलग पाचव्या लढतीत किमान अर्धशतकी भागीदारी रचताना भारताच्या विजयाचा पाया रचला. राहुलने गेल्या पाच सामन्यांतील चौथे, तर रोहितने मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले. टिम साऊदीने या दोघांसह सूर्यकुमार यादवला (1) तीन षटकांच्या बाद करून सामन्यात रंगत निर्माण केली. परंतु ऋषभ पंतने (6 चेंडूंत नाबाद 12) सलग दोन षटकार लगावून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.