भारताचा युवा हॉकी संघ अंतिम चारमध्ये

कनिष्ठ विश्वचषकामध्ये नेदरलँड्सवर मात


| क्वालालम्पूर | वृत्तसंस्था |

भारताच्या युवा पुरुष हॉकी संघाने नेदरलँड्स संघावर रोमहर्षक विजय संपादन केला. पूर्वार्धात 0-2 आणि तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये 3-2 अशा पिछाडीवरून भारतीय संघाने नेदरलँड्स संघावर 4-3 असा सनसनाटी विजय मिळवला आणि कनिष्ठ हॉकी विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघासमोर उपांत्य फेरीत जर्मनीचे आव्हान असणार आहे. जागतिक क्रमवारीत भारत तिसऱ्या आणि नेदरलँड्स चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन तुल्यबळ देशांमध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगला. या लढतीच्या सुरुवातीलाच टिमो बोएर्स याने नेदरलँड्स संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्याने पाचव्या मिनिटाला गोल केला.

यानंतर भारताने बचावफळीत दमदार कामगिरी केली; मात्र तरीही 16 व्या मिनिटाला पेपी वॅन डर हायडेन याने पेनल्टी कॉर्नरवर नेदरलँड्स संघासाठी दुसरा गोल केला. पूर्वार्धात नेदरलँड्स संघाकडे 2-0 अशी आघाडी कायम राहिली.

झोकात पुनरागमन

भारतीय हॉकीपटूंनी तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये झोकात पुनरागमन केले. 34 व्या मिनिटाला आदित्य ललागे याने अप्रतिम फिल्ड गोल केला. अरायजीत हुंडल याने या गोलला साह्य केले. त्यानंतर लगेचच अरायजीत सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत भारताला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. 44 व्या मिनिटाला ओलिव्हिएर हॉर्टेनसियस याने पेनल्टी कॉर्नर गोल करत नेदरलँड्स संघाला 3-2 अशी पुन्हा आघाडी मिळवून दिली.

अखेरच्या क्षणांमध्ये प्रभाव

भारतीय हॉकीपटूंनी सामना संपायला अखेरची दहा मिनिटे बाकी असताना सर्वस्व पणाला लावत खेळ केला. सौरभ आनंद खुशवा याने 52 व्या मिनिटाला; तर उत्तम सिंग याने 57 व्या मिनिटाला गोल करत भारताला 4-3 असा विजय मिळवून दिला. रोहित याने बचावात शानदार कामगिरी केली. त्याने नेदरलँड्सच्या संघाला मिळालेले सहा पेनल्टी कॉर्नर लीलया परतवून लावले. त्याचीच सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

Exit mobile version