एसटीचा खासगीकरणाचे संकेत

तोट्यातून बाहेर पडण्यासाठी निर्णय
। मुंबई । वृत्तसंस्था ।
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांचा सध्या संप सुरू आहे. संपाचा तिढा कायम आता असताना एसटीचा खासगीकरणाकडे प्रवास सुरू असल्याचे संकेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तोटयात गेलेली एसटी नफ्यात आणण्यासाठी एसटीच्या खासगीकरणाचा पर्याय पुढे आला असून, याबाबत अभ्यास करण्यासाठी केपीएमजी या खासगी संस्थेची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब आणि एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या गुरुवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या चार वर्षांत घटलेली प्रवासी संख्या, करोनाच्या साथीचा फटका, संप आदींमुळे एसटीचे आर्थिक चाक आणखी खोलात रुतले. एसटीचे वार्षिक प्रवासी उत्पन्न सात ते आठ हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. मात्र, त्या तुलनेने खर्च अधिक असल्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती खालावत गेली. या पार्श्‍वभूमीवर एसटीला तोटयातून नफ्यात आणण्यासाठी महामंडळ पर्याय शोधू लागले असून, आता खासगीकरणाचा विचार करण्यात येत आहे.
खासगीकरणाचा उत्तरप्रदेश पॅटर्न
उत्तरप्रदेशातही परिवहन मंडळाच्या मालकीच्या बहुसंख्या गाड्या खासगी मालकीच्या आहेत. उत्तर प्रदेशाच्या एसटी महामंडळात सध्या 11 हजार 393 बसेसचा ताफा असून, यातील दररोज 9,233 बसेस रस्त्यावर धावतात. यातील 2,910 बसेस या भाडेतत्त्वावर धावत आहेत. एकूण बसेसपैकी 30 टक्के बसेस उत्तर प्रदेशच्या एसटी महामंडळात खासगी बसेस आहे. या बसेसच्या ताफ्यानुसार उत्तर प्रदेशच्या एसटी महामंडळात फक्त 21 हजार 10 कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रति बसेसवर फक्त तीन कर्मचारी आहेत.

Exit mobile version