नवी मुंबईच्या प्रारुप आराखड्याबाबत उदासिनता

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात जवळपास 25 किलोमीटर पालिकेचे नागरी क्षेत्रफळ कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची या विकास आराखड्याबाबत उदासीनता दिसून येत आहे.

नवी मुंबई पालिकेचे एकूण क्षेत्रफळ 109.59 चौरस किलोमीटर दर्शविण्यात आले आहे. मात्र या क्षेत्रफळातील 18.62 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे सागरी नियंत्रण कायदा एक व 6.45 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे सागरी नियंत्रण कायदा दोनमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे केवळ 84.47 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ शिल्लक राहणार आहे.

200 ते 300 हेक्टर जमीन नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला कमी पडणार आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका क्षेत्राला सिडकोच्या आरक्षित भूखंडांची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे. पालिकेने 32 महिन्यांपूर्वी शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. त्याला प्रसिद्ध करण्याची परवानगी नगरविकास विभागाने नुकतीच दिली आहे. त्यामुळे पालिकेने तो 9 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केला असून त्यावरील हरकती व सूचनांसाठी 60 दिवसांची मुदत दिली आहे. यातील 20 दिवसांचा कालावधी संपला असून आता केवळ 40 दिवस शिल्लक आहेत.

सणासुदीच्या काळात हा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आल्याने लोकप्रतिनिधींना त्याचा अभ्यास करून हरकती व सूचना नोंदविण्यास कमी कालावधी मिळाला आहे. यात नवी मुंबईकरांची या विकास आराखड्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. भावी लोकसंख्येचा विचार केला तर सडकोच्या भूखंडाची पालिकेला मोठी गरज आहे. त्यामुळे सिडकोने दिलेले भूखंड पदरात पाडून घेतले जाणार असून मोठ्या भूखंडांसाठी संर्घष केला जात नाही. काही भूखंडांवर अतिक्रमण झाले असून ते भूखंड सिडकोने पालिकेला सोडले आहेत. त्यामुळे त्या भूखंडावरील अतिक्रमण कमी करण्याचे आव्हान असणार आहे.

महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ 109.59 चौरस किलोमीटर असून यात एमआयडीसीचा 74 किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे. पूर्वेला पारसिक डोंगर आणि पश्‍चिम बाजूला ठाणे खाडी यांमधील भूभागावार वसलेल्या नवी मुंबईतील सुमारे 25 किलोमीटर लांबीचा खाडी किनारा असून यातील 18.62 चौरस किलोमीटर क्षेत्रपळ हे सागरी नियंत्रण कायदा (सीआरझेड) एकमध्ये येत असून दुसरे 6.45 चौरस किलोमीटर लांबीचे क्षेत्रफळ हे सागरी नियंत्रण कायदा दोन मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे या भूभागावर पालिका कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू शकणार नाही. त्यामुळे 109 चौरस किलोमीटर क्षेत्रफळामधून 25 किलोमीटर सीआरझेड क्षेत्र कमी करता पालिकेला नागरी सेवासुविधा आणि लोकवस्तीसाठी केवळ 84.47 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ शिल्लक राहात आहे.

उत्तुंग इमारतींचा पर्याय
नवी मुंबईत अनेक इमारती एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीच्या अनुषंगाने टोलेजंग उभ्या राहात आहेत. त्यांची उंची 30 ते 32 मजल्यापर्यंत जात असून शहराच्या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी पाचपेक्षा जास्त वाढीव चटई निर्देशांकाने इमारती उभ्या राहणार आहे. त्यामुळे विस्तार मर्यादा आलेली नवी मुंबई आकाशाच्या दिशेने वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version