रोहा-तांबडी रस्त्याबाबत उदासीनता

| धाटाव | प्रतिनिधी |

रोहा-तांबडी रस्त्याला साईट पट्टीच नाही. रस्ता अरुंद व खराब याकडे सार्वजनिक बांधकाम खाते कित्येक वर्ष डोळेझाक करीत आहे. परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधी या रस्त्याबाबत उदासीन असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने परिसरातील नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

रोहा-तांबडी रस्त्याला प्रचंड वर्दळ असते. या रस्त्याला लागून अनेक फार्म हाऊस आहेत. पुढे याच रस्त्याने प्रवास होतो, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. परंतु, गेले कित्येक वर्ष या रस्त्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की, कधीही या ठिकाणी अपघात होऊ शकतो. मुळात रस्ता खराब व अरुंद आणि त्यातच साईट पट्ट्या नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूने येणाऱ्या मोठ्या गाड्या पास होत नाहीत. आणि अशावेळी मोटर सायकल चालवणाऱ्या व्यक्तीला कसरत करावी लागते. तसेच, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात घडले आहेत. परंतु, या रस्त्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र, खराब रस्त्याचा त्रास सामान्य माणसाला सोसावा लागत आहे. रोहा-तांबडी रस्ता करता येत नाही, की लोकप्रतिनिधी जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करतात, असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. विकास केला नाही तरी पाच वर्षांनी प्रचंड मताधिक्य मिळते हेच फावतं.त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचा वाली कोण राहिला नाही.हेच या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेवरून दिसून येत आहे.

Exit mobile version