नौदलाचे स्वदेशीकरण ही छत्रपती शिवरायांना मानवंदना

। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतीय नौदलाचे स्वदेशीकरण-आत्मनिर्भरता ही, भारतीय आरमाराचे संस्थापक मानल्या जाणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. नौदलाच्या किलर स्क्वार्डन तुकडीला प्रेसिडंट स्टँडर्ड पुरस्कार देण्याच्या समारंभात ते बोलत होते.
कोविंद यांनी मुंबईतील नौदल गोदीतील समारंभात भारतीय नौदलाच्या 22 व्या क्षेपणास्त्र युद्धनौका तुकडीला प्रेसिडंट स्टँडर्ड हा पुरस्कार दिला. राष्ट्रासाठी केलेल्या सेवाकार्याबद्दलचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. यावेळी नौदलाच्या आत्मनिर्भर धोरणाबाबत राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. सतराव्या शतकात सुसज्ज आरमाराची उभारणी करणार्‍या शिवाजी महाराजांना अनेक इतिहासकार भारतीय नौदलाचे संस्थापक मानतात. आजच्या भारतीय नौदलाचे आत्मनिर्भरतेचे तत्व म्हणजे द्रष्टे राजे असलेल्या शिवरायांना आदरांजली आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील भू-राजकीय आव्हानांना तोंड देतानाच महत्वाची भूमिका बजावण्याची संधी भारताला मिळाली आहे. बहुतांश जागतिक व्यापार याच क्षेत्रातून होत असल्याने येथे शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे जागतिक समुदायासाठी महत्वाचे आहे. भारतीय नौदल हे बलवान नौदल असल्याने या क्षेत्रातील शेजारी देश हे सुरक्षाविषयक भागीदार म्हणून भारताला प्राधान्य देत असल्याचेही राष्ट्रपतींनी अभिमानाने नमूद केले.

Exit mobile version