माणगावात बेशिस्तपणा कोविडला कारणीभूत


प्रशासन ठरतंय कुचकामी, जनजागृतीची गरज
। माणगांव । सलीम शेख ।
कोविड महामारीच्या दुसर्‍या लाटेत माणगाव नगरीसह तालुक्यात दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळत असून गेली साडेतीन महिने 30 ते 35 रुग्णांची सरासरी अद्यापही कमी झालेली नाही. याची कारणे पहिली तर नागरिकांचा बेशिस्तपणा यास कारणीभूत ठरत असून स्थानिक प्रशासनाचा यावर वचक नसल्याने ते कुचकामी ठरत असून यावर मात करण्यासाठी खर्‍या अर्थाने गावागावातून उपाययोजना म्हणून जास्तीत जास्त गावकर्‍यांमध्ये कोरोनामुक्त आपलं गाव करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.

माणगाव नगरीसह तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा अद्याप कमी झालेला नाही. दुसर्‍या लाटेत तालुक्यात मृतांचा आकडाही वाढत आहे. आतापर्यंत तालुक्यातील 94जणांचे जीव कोरोना महामारीने गेले आहेत. याकडे तालुक्यातील गावांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

माणगावात नगरपंचायत प्रशासनाने तसेच महसूल खात्याने याबाबतीत दुकानदार व नागरिक यांच्यात पोलिसांच्या मदतीने दरारा निर्माण करायला हवे. माणगावात अजूनही बेशिस्तपणा दिसत आहे. दुकाने व बँकांसमोर कुठलेही सोशल डिस्टिन्सिंग ठेवलेले दिसत नाही. गर्दीमुळे विशेषकरून ही महामारी फैलावत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे सोशल डिस्टिन्सिंग महत्वाचे आहे. याचबरोबर लसीकरण महत्त्वाचे आहे. अजूनही तालुक्यातील अनेक गावांतील नागरिक लसीकरणाच्या बाबतीत गांभीर्याने घेताना दिसत नाही.गावागावांतून प्रशासनाने लसीकरण व कोविड नियमांबाबत जास्तीत जास्त जनजागृती करणे आवश्यक आहे. माणगाव तालुक्यात खरे पाहता जनता कर्फ्यूची आवश्यकता आहे. अत्यावश्यक सेवा असलेले रुग्णालये व औषधांची दुकाने वगळून इतर सर्वच दुकाने किमान दहा दिवस पूर्णपणे बंद ठेवली पाहिजेत. तरच कोरोनामुक्त माणगाव तालुका झाल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा तालुक्यात कोरोनाला रोखणे कठीण जाईल.

कडक निर्बंधाची गरज
तालुक्यातील देवकुंड धबधबा, ताम्हाणे घाटातील धबधबे ओसांडून वाहत असल्याने स्थानिकांबरोबरच पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटक याठिकाणी येत आहेत. तसेच माणगाव शहर हे मध्यवर्ती असल्याने श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर, दिवेआगर येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी समुद्र किनार्‍यावर पर्यटक हे माणगाववरून जात असतात. यासाठी काही गोष्टींवर प्रशासनाने तालुक्यात अजूनही कडक निर्बंध लादणे गरजेचे आहे.

Exit mobile version