औद्योगिकीकरण शेतीच्या मुळावर

वरकस व भातशेतीचे क्षेत्र घटले
विविध प्रकल्पांमुळे शेतकरी विस्थापित

| माणगाव | सलीम शेख |

सध्या माणगाव तालुक्यात औद्योगिकीकरणासाठी जमीन भूसंपादनाचे काम वेगात सुरु आहे. त्यामुळे तालुक्यातील वरकस व भात पिकाचे क्षेत्र यंदाचे वर्षी घटले असून, या जमिनीवर औद्योगिकीकरणाची संक्रांत आली आहे. त्यामुळे इथला शेतकरी विस्थापित होत आहे. या शेतकर्‍यांची अनेक तरुण मुले गावात न राहता ती शहराकडे जात आहेत. त्यामुळे भविष्यात इथले भात व नाचणी पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. माणगाव तालुक्यात दरवर्षी शेकडो हेक्टर शेतीचे क्षेत्र घटत आहे. सरसरी गेल्या पाच वर्षांत हे क्षेत्र कमालीचे घटले आहे. गेल्या वर्षी भातपिकाचे सरासरी क्षेत्र 12,589 होते. यंदा 1038 हेक्टर एवढे भातपिकाचे क्षेत्र कमी झाले असून, 11,281 हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी केली आहे. त्यामुळे खरीप हंगामात 3293 मेट्रिक टन उत्पादन यंदा घटणार आहे. त्याचबरोबर नाचणी पिकाचे गेल्या वर्षी 1099 हेक्टर सरासरी क्षेत्र होते. चालू वर्षी 722 हेक्टरवर नाचणी पिकाची पेरणी केली आहे. त्यानुसार 377 हेक्टर क्षेत्र नाचणी पिकाचे क्षेत्र कमी झाले असून, यंदा 588 मेट्रिक टन नाचणीचे उत्पादन कमी होणार आहे. दरम्यान, पारंपरिक व संकरीत भात बियाणे, आधुनिक तंत्राचा वापर करून भातशेती पिकविणार्‍या शेतकर्‍याने काहीअंशी फळलागवड केली असून, अलीकडच्या काळात भाजीपाला व कडधान्य ही पिके घेऊन शेतकरी कलिंगडासारख्या नगदी पिकाचे उत्पादन घेऊन नशीब आपले अजमावत आहे.

सातबारावर शेरे
माणगाव तालुक्यात डी.एम.आय.सी. आणि एम.आय.डी.सी.मुळे 47 गावांतील जमिनी अधिग्रहन करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या तालुक्यातील डोंगर, पड, भातशेती असे सर्व मिळून क्षेत्र 10 हजार 503 हेक्टर क्षेत्र अधिग्रहणाचे काम चालू आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. बाधित शेतकर्‍यांच्या जमिनीच्या सात-बारावर पेन्सिलचा शेरा, पक्का शेरा, मोबदला मिळालेल्या जमिनीचे शासनाच्या अधिग्रहण पूर्ण झालेली प्रक्रिया असे शेरे मारले आहेत.

प्रकल्प शेतकर्‍यांच्या मुळावर
माणगाव तालुक्यात मुंबई-गोवा महामार्ग, दिघी-पुणे राज्यमार्ग, कोकण रेल्वे दुहेरीकरणासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्यातच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोरसाठी जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया जोरात सुरु आहे. त्यामुळे या विविध प्रकल्पांमुळे शेतकरी विस्थापित होत आहे.

Exit mobile version