। राजापूर । वृत्तसंस्था।
समाधानकारक पावसामुळे लावणी वेळेत पूर्ण झाली; मात्र काही भागामध्ये भातशेतीवर करपा रोगासह निळ्या भुंगेरासारख्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकर्याची चिंता वाढली. पावसाने दडी मारल्यास करपा रोगासह किडीचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भिती आहे.
यावर्षी शेतकर्यांनी लावणी वेळेत पूर्ण केली. मध्यंतरी अतिवृष्टीने नद्यांच्या काठावरील भातशेतीची कामे रखडली होती; मात्र पावसाने उसंत घेताच आणि पूर ओसरताच काठावरील शेतीची कामेही पूर्ण झाली. आता पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे भातशेती तरारली आहे; काही गावांमध्ये शेतीवर मोठ्या प्रमाणात करपा रोगासह निळा भुंगेरा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकर्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. अर्जुना नदीच्या काठावरील गावांसह शीळ, गोठणेदोनिवडे आदी परिसरातील शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक शेतांच्या मळ्यांमधील भाताची रोपे किडींनी खाऊन फस्त केली आहेत.
सध्या सरींवर पाऊस असल्याने करपा रोगाचे भातशेतीवरील प्रादुर्भावाचे प्रमाण कमी आहे; मात्र पाऊस थांबून ऊन पडल्यास करपा रोगाचे प्रमाण वाढून त्याचा फटका भातशेतीचे नुकसान होऊन त्याची झळ शेतकर्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रकाश शिंदे, शेतकरी