भात पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव

कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यातील रोवळा व वरळ या भागांमध्ये भात पिकावरती पिवळ्या खोड किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. कृषी विभागाकडून तालुक्यामध्ये क्रॉप सॅप योजना राबवली जात आहे. या योजने अंतर्गत भात पिकांच्या कीड रोगांची निरीक्षणे वेळोवेळी मोबाईल अँपच्या माध्यमातून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या अंतर्गतच निरीक्षणे घेत असताना खोड किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आले आहे खोड किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतवरती जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

सध्या तालुक्यात उष्ण व दमट हवामान असल्याने काही गावांमध्ये किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे या किडीची अळी सुरूवातीस काही वेळ कोवळया पानांवर आपली उपजीविका करते. नंतर ती खाली येऊन खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते व आतील भाग पोखरून खाते. किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत म्हणजेच फुटवे येण्याच्या अवस्थेत किंवा पिक पोटरीवर येण्यापुर्वी झाला तर रोपाचा मधला पोंगा लालसर पिवळा पडून वरून खाली सुकत येतो, यालाच गाभामर असे म्हणतात. सुकलेला किंवा मेलेला पोंगा हाताने ओढला असता सहजासहजी निघून येतो. पोटरीतील पिकावर देखील खोडकीडीचा उपद्रव आढळुन येतो आणि त्यामुळे दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्रा बाहेर पडतात. यालाच पळींज किंवा पांढरी पिशी असे म्हणतात. परिणामत: भाताच्या उत्पादनात मोठया प्रमाणावर घट येते. पिकाची वरचेवर पाहणी करून कीडग्रस्त फुटवे काढून नष्ट करावेत. हे काम हंगामातून तीन ते चार वेळा करावे. शेतात पक्षीथांबे लावावेत. जर शेतामध्ये 5 टक्के कीडग्रस्त फुटवे दिसल्यास, फवारणीसाठी क्विनॉलफॉस 3.2 मिली या कीटकनाशकाची प्रतिलिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. अधिकच्या माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यलयास संपर्क करण्याचे आवाहन सचिन जाधव यांनी केले आहे.

रोवळा व वरळ या गावामधील काही भात शेतांमध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव झाला असून किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खाली आहे.प्रादुर्भाव वाढल्यास कृषी विभागाकडून 50 टक्के अनुदानवरती औषधे उपलब्ध करून देण्यात येतील.

सचिन जाधव
मंडळ कृषी अधिकारी
Exit mobile version