पावसाने उघडीप दिल्याने धोका
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात भाताची शेती यावर्षी बहरली होती. मात्र, श्रावण महिना सुरु झाला आणि त्यानंतर पावसाने उघडीप घेतली आहे. त्याचा परिणाम भाताच्या पिकावर खोडकिड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला असून, एक चांगला पाऊस शेतातील पिकाचे नुकसान टाळण्यासाठी होण्याची गरज आहे. मात्र, कृषी विभागाने खोडकिडा नियंत्रित आणण्यासाठी शेतकर्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती प्रसारित केली आहे.
कर्जत तालुक्यात यावर्षी तब्बल 9500 हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली आहे.खरीप हंगामात भाताची शेती बहुसंख्य शेतकरी करीत असतात. दरम्यान, पावसाने उघडीप घेतल्यावर भाताच्या पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाणदेखील वाढले असते. यावर्षी जुलै महिन्यात पूर्ण महिना चांगला पाऊस झाला आहे. मात्र, श्रावण महिना सुरु झाला आणि पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यात माळरानावर असलेली भाताची खाचरे यात पाण्याचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे भाताच्या पिकावर खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. खोडकिडीचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी शेतकर्त्यांनी कीटकनाशकांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
खोडकिडा नियंत्रणात आणण्यासाठी
शेतात खोडकिडा झालेल्या ठिकणी कारटेप हायड्रो क्लोराईड या कीटकनाशकाची फवारणी करावी. प्रतिएकर 200 ग्रॅम कीटकनाशक लागेल आणि फवारणीनंतर शेतकर्यांनी कृषी अधिकारी यांना पाहणीसाठी बोलावून पुढील सल्ला घ्यावा, असे आवाहन कृषी साहित्य विक्रेते रामदास तुपे यांनी केले आहे.
भातपिकावर पडणार रोग
करपा, खोडकिडा, कडा करपा, लष्करी अळी, गाद माशी, पिवळा खोडकिडा, निळे भुंगे, तपकीर तुडतुडे आणि पूर्व कोष करपा.