जाहिरातीच्या फलकांमधून आमदारांना डावलले
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून शिंदे गट विरूध्द राष्ट्रवादीमधील वाद जगजाहिर असताना आता शिंदे गटातील अंतर्गत तटाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. अलिबाग तालुक्यात दिवाळीसह वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या जाहीरातीचे फलक शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहेत. मात्र, फलकांमधून काहींनी आमदार दळवींना डावलले आहे. त्यामुळे शिंदे गटात एकमेकांमध्ये धुसपूस सुरु असल्याचे राजकीय वर्तूळात बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात काम केल्याने भाजपने दिलीप भोईर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे दिलीप भोईर यांच्यासाठी घर का ना घाट का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोणाकडे जायचे अशी त्यांची घालमेल सुरु होती. दळवींसोबत जायचे नाही, अशी त्यांची सुरुवातीची भुमिका होती. परंतु, दळवींनी त्यांना काही आमिष दाखविल्यावर दिलीप भोईर शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे राजा केणीला भोईर यांची अडचण होण्याची चर्चा होती. परंतु, नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे दिलीप भोईर यांचा सन्मान झाल्याची चर्चा आहे. आता मात्र भोईर यांना फारसा प्रतिसाद दळवींकडून मिळत नसल्याची चर्चा आहे. त्यांना एकटेच टाकले जात असल्याचे बोलले जात आहे. तसेच दिलीप भोईर यांचे साथीदार सुधीर चेरकर आणि दळवींचे समर्थक अनंत गोंधळी यांच्यामध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत कलह असल्याची चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी या दोघांनी एकमेकांचे वेगवेगळे जाहिरातीचे फलक लावण्यास सुरुवात केली आहे. यातील एकाच्या फलकांमधून आमदारांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटात अंतर्गत तट असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. अनंत गोंधळी हे आमदार दळवींचे अगदी जवळचे तर सुधीर चेरकर यांना दिलीप भोईर यांच्या जवळचे मानले जाते. वेगवेगळ्या कार्यक्रमात दळवींच्या बाजूला गोंधळी असतात. त्यामुळे आगामी निवडणुकीत गोंधळी कि चेरकर यापैकी कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.







