। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या प्रत्येक मतदारसंघात अनंत गीते आघाडी घेतील, असा विश्वास आहे. प्रचाराच्या दरम्यान 40 हून अधिक सभा घेतल्या आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे दिग्गज नेतेमंडळी आले. या सभांच्या दरम्यान जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळाला. स्वच्छ चारित्र्याचा माणूस म्हणून गीतेंकडे पाहिले जाते. त्यामुळे ते प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी आ. पाटील बोलत होते. यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हा सल्लागार बबन पाटील व अन्य मंडळी उपस्थित होते.
यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत अनिल परब आणि अभ्यंकर या दोघांचे अर्ज भरण्यासाठी आलो. मुंबईमध्ये महाविकास आघाडी तथा इंडिया आघाडीचे दोन्ही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील, अशी खात्री आहे. अभ्यंकरांनी शिक्षण क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम केले आहे. गोरगरीब मुलांना शिकविण्याचे कामही त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण क्षेत्रातील मंडळी चांगली साथ देतील, असा विश्वास आहे. अनिल परब हे प्रभावी, आक्रमक असून, विधिमंडळात सर्व विषयांवर बोलताना एक वकील म्हणून त्यांच्याकडे आम्ही आदराने बघतो. गेली पंधरा वर्षे ते विधिमंडळात आहेत. त्यांच्यासारखा आक्रमक नेता विधान परिषदेमध्ये येणार याचा आनंद आहे. त्यांनी मंत्रिमंडळाच्या कारकीर्दीत मंत्री म्हणून प्रभावीपणे केलेले काम न विसरण्यासारखे आहे. विधिमंडळात अशा लोकप्रतिनिधींची गरज आहे. सभागृहात बोलणारा एक चांगला वक्ता, आमदार म्हणून परब यांच्या रुपाने मिळतोय, याचा आनंद आहे.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार आहे. मुंबईच्या सर्वचच्या सर्व जागा मिळतील, असा विश्वास आहे. मुंबई महाविकास आघाडीच्या सोबत आहे. त्यामुळे विजय हा निश्चितच आहे, असे आ. जयंत पाटील म्हणाले.