सर्वसामान्यांना महागाईचा फटका!

एलपीजीच्या दरात वाढ, घरगुती अनुदानित सिलिंडर 25 रुपयांनी महागला
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आधीच पेट्रोल आणि डिझेलचे दर इतके वाढले असताना, आता सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या किंमतीही वाढवल्या आहेत. 14 किलोच्या अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात 25 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता घरगुती अनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी 834 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत.

दिल्लीमध्ये आज 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी 809 ऐवजी 834 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत. तर, मुंबईतही इतकेच पैसे मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरचा दर 835 रुपये 50 पैशांवरुन 861 रुपये झाला आहे तर चेन्नईत एलपीजी सिलेंडरसाठी 850 रुपये 50 पैसे इतका दर आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एलपीजी सिलेंडरचा दर 872 रुपये 50 पैसे इतका झाला असून गुजरातमधील अहमदाबादमध्ये 841 रुपये 50 पैसे झाला आहे.

सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. याआधी 1 मे रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. तर एप्रिल महिन्यात 10 रुपयांनी दर कमी करण्यात आले होते. तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हे दर वाढले होते. दरम्यान, या वर्षभरात एलपीजी सिलेंडरच्या दरात एकूण 140 रुपयांची वाढ झाली आहे.

Exit mobile version