। मुंबई । वार्ताहर ।
सध्याच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईने होरपळून निघालेल्या जनेतेला आता मोदी सरकारने पुन्हा एक दणका दिला आहे. मे महिन्यात दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. बारा दिवसांपूर्वी 50 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. आज गुरूवारी हे दर पुन्हा 3 रुपये 50 पैशांनी वाढवण्यात आले. तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात आठ रुपयांनी वाढ झाली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असल्याने संताप व्यक्त होतं आहे.
मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यातच या महिन्यात गॅसच्या किंमतीत दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना झळा सोसाव्या लागत आहेत. यापूर्वी एक मे रोजी व्यावसायिक वापराच्या 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 102.50 रुपयांची वाढ झाली होती. गुरूवारी पुन्हा आठ रुपयांनी हा सिलेंडर महागला. त्यामुळे हा सिलेंडर आता 2 हजार 363 रुपयांना मिळणार आहे
काही दिवसांपूर्वी देशातील अनेक शहरांतील घरगुती गॅस सिलेंडरच्या दराने हजारचा टप्पा ओलांडला आहे. आता त्यामध्ये गुरूवारी आणखी भर पडली आहे. गुरूवारी 3 रुपये 50 पैशांनी भाववाढ झाल्याने राजधानी दिल्लीसह मुंबईतील दर 1हजार 3 रुपयांवर पोहचले आहेत. तर कोलकाता शहरातील दर 1 हजार 29 आणि चेन्नईतील दर 1018.50 रुपयांवर गेले आहेत.
दरम्यान, गॅस सिलेंडर एका आठवड्यात दोनवेळा दणका दिला असतानाच पेट्रोल-डिझेलच्या किंमती मात्र मागील दीड महिन्यापासून स्थिर आहेत. इंधनाच्या दरात शेवटची वाढ सहा एप्रिल रोजी झाली होती. त्यापूर्वी साडेचार महिने स्थिर असलेल्या पेट्रोल , डिझेलच्या दरवाढीला २२ मार्चपासून सुरुवात झाली होती आणि सहा एप्रिलपर्यंत दरात लिटरमागे दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढ झाली होती.