महागाईने कर्ज महागणार!

रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवला

मुंबई । प्रतिनिधी

महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ करुन सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. या दरवाढीनंतर बँकेचा रेपो दर 4.40 टक्के झाला असून सर्वच प्रकारची कर्ज महागणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी (4 मे)पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. देशात महागाईने कहर केला आहे. मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दर 6.95 टक्के इतका वाढला होता. मागील 17 महिन्यांतील किरकोळ महागाईचा हा उच्चांकी दर आहे. खाद्य वस्तूंच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ महागाईचा पारा वाढण्यास कारणीभूत ठरली. दरम्यान, 8 एप्रिल 2022 रोजी रिझर्व्ह बँकेने पतधोरण स्थिर ठेवले होते. मात्र महागाईवर बारीक लक्ष ठेवून राहणार असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटलं होते. रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम आता जाणवत असल्याचे दास यांनी सांगितले. पेट्रोल-डिझेल, सीएनजी, स्वयंपाकाचा गॅस, दूध, भाजीपाला, मांस, अंडी यासारखे खाद्यान्न तसेच दैनंदीन वापराच्या वस्तूच्या किंमतीत वाढ झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात महागाईचा आगडोंब उसळला आहे. मार्च महिन्यात घाऊक बाजारातील महागाई दर 14.55 टक्के इतका वाढला आहे. महागाईचा हा उच्चांकी स्तर आहे. त्याआधीच्या फेब्रुवारी महिन्यात तो 13.11 टक्के इतका होता.

शेअर बाजार कोसळला

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचे पडसाद शेअर बाजारावर उमटले आहेत. या निर्णयानंतर शेअर बाजार कोसळला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये तब्बल 1403.13 टक्क्यांची म्हणजेच 2.46 टक्क्यांची घसरण झाली. तर निफ्टीमध्ये 439.70 म्हणजेच 2.58 अंकांची घसरण नोंदवली गेली.

Exit mobile version