मार्गशीर्षमुळे बाजारात फळांची आवक

मागणी वाढल्याने दरही वधारले

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

थंडीचा हंगाम फळे, पालेभाज्यांसाठी पोषक असल्याने सध्या उत्पादन वाढले आहे. त्यातच मार्गशीर्ष सुरू झाल्याने अनेकजण व्रत-वैकल्य, उपवास करीत असल्याने फळांना मागणी वाढली आहे. सध्या बाजारात फळांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. अनेक महिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीचे उपवास करीत असून पूजेसाठी फळांची मागणी वाढल्याने दरही 10 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत.

मार्गशीर्ष महिन्यात महिलावर्गांचे उपवास सुरू होत असल्याने, भाजीपाल्याबरोबरच फळांनादेखील मागणी वाढते. त्यानुसार बाजारात संत्री, मोसंबी, पेरू, सफरचंद, पपई, कलिंगड, अननस यांसारख्या देशी फळांची आवक वाढली आहे. एपीएमसीतील फळ बाजारात मंगळवारी 2 हजार 662 क्विंटल संत्र्यांची, 800 क्विंटल सफरचंदाची तर 1 हजार 810 क्विंटल मोसंबीची आवक झाली आहे. घाऊक बाजारात दर आवाक्यात असले तर किरकोळ बाजारात मात्र फळांचे दर चढेच आहे.

पूजेसाठी पाच फळांना पसंती
किरकोळ बाजारात फळांचे दर किलोमागे 10 ते 30 रुपयांनी वाढले आहेत. किरकोळ बाजारात पूजेसाठी पाच फळांना विशेष मागणी आहे. शंभर रुपयांना छोटी पाच फळे मिळत आहेत. आकाराने मोठी असणारी फळे हे 100 ते 200 रुपयांपर्यंत मिळतात.
फळांचे घाऊक दर (प्रतिकिलो रुपयांत)
संत्री:- 22 ते 45
मोसंबी:- 20 ते 40
पेरू:- 22 ते 50
सफरचंद:- 65 ते 120
पपई:- 10 ते 25
कलिंगड:- 15 ते 20
अननस:- 20 ते 50
डाळिंब:- 80 ते 160
Exit mobile version