| रत्नागिरी | प्रतिनिधी |
राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) एक महत्वपूर्ण बदल झाला आहे. या व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरेतर आतापर्यंत जी व्यवस्था होती, त्या माध्यमातून रेशन दुकानात भेट दिल्यानंतरच नागरिकांना पुढील महिन्याचे धान्य मिळणार की नाही आणि मिळणार असेल तर ते किती प्रमाणात मिळणार, याची माहिती मिळत होती. मात्र आता ही व्यवस्था आणखी फायदेशीर बनवण्यात आली आहे. आता ही सगळी माहिती नागरिकांना रेशन दुकानात जाण्यापूर्वीच मिळणार आहे. ही माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार अन यासाठी नवीन सुविधा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबरपासून या प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अनेक लाभार्थ्यांना याचे एसएमएस मिळाले आहेत. या नवीन एसएमएस सेवेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला धान्य वितरणापूर्वी एक मॅसेज पाठवला जाणार आहे. या मॅसेजमध्ये नागरिकांना मिळणाऱ्या धान्याचा प्रकार जसे की बाजरी, तांदूळ, गहू आणि त्याचे प्रमाण आणि वितरणाचा संबंधित महिना याची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांची मनमानी आता बंद होणार आहे.







