मुंबईत दहशतवादी घुसल्याची माहिती खोटी

संबंधित आरोपीवर महाराष्ट्र एटीएसची कारवाई

। मुंबई । वृत्तसंस्था ।

शुक्रवारी (दि.7) मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये कॉल करुन मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याची चुकीची आणि खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संबंधित आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

दुबईहून शुक्रवारी सकाळी तीन दहशतवादी मुंबईत आले आहेत, त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे, असं संबंधित आरोपी यासिन सय्यद याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये फोन करुन सांगितलं होतं. यावेळी त्याने एका दहशतवाद्याचं नाव मुजीब सय्यद असल्याचं सांगितलं होतं. तसंच त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर पोलिसांना दिला होता.

दरम्यान पोलिसांनी संबंधित फोन कॉल गांभीर्याने घेत, संबंधित व्यक्ती, मोबाईल नंबर आणि गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सोबतच महाराष्ट्र एटीएसने देखील तपास केला. तपासादरम्यान कॉल करणारी व्यक्ती अहमदनगरमधील असल्याचं समोर आलं. वैयक्तिक वैमनस्यातून अशाप्रकारे फोन करुन खोटी माहिती दिल्याचे तपासात उघड झाले. यानंतर महाराष्ट्र एटीएसने आरोपीला अहमदनगरमधील अटक करुन मुंबईत आणलं आणि पुढील कारवाईसाठी आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

Exit mobile version