| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नागरिकांवर अन्याय अत्याचार होऊ द्यायचे नसतील तर त्यांना संविधानाने दिलेले अधिकार माहीत व्हायला पाहिजेत. त्याचबरोबर प्रशासनात काम करणार्या प्रत्येकाने संविधानानुसार कर्तव्याची जाणीव ठेवायलाच पाहिजे. यासाठी संविधान दिनाचा जागर घरोघरी झाला पाहिजे असे मत सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधान दिनानिमित्त शनिवारी येथील अलिबाग संविधान जागर समितीतर्फे अलिबाग शहरात संविधान जागर यात्रा काढण्यात आली. यावेळी संविधानाच्या विजयाच्या घोषणांनी अलिबाग शहर दणाणून गेले. या संविधान जागर यात्रेमध्ये संविधान जागर यात्रा समितीचे समन्वयक अरविंद निंगळे, काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अॅड. श्रद्धा ठाकूर, सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते दिलीप जोग, समाजवादी पक्षाचे अलिबाग तालुका अध्यक्ष अशरफ घट्टे, पी.बी. आचार्य, दादा खंडारे, फिरोज घट्टे आदी विविध पक्षाचे आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, महाविद्यालय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळी 11 वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून व संविधान उद्देशिकेचे वाचन करुन या संविधान जागर यात्रेला सुरुवात करण्यात आली. अलिबाग शहरातून सदर जागर यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आली. त्या ठिकाणी रॅलीचे सभेत सुपांतर झाले.






