शहापूर-धेरंड शेतकर्‍यांचे माहितीचे आंदोलन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
संविधान दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील शहापूर धेरंड येथील शेतकर्‍यांनी अलिबाग प्रांत कार्यालयात माहितीचे आंदोलन केले. शहापूर-धेरंड येथील एमआयडीसी भुसंपादनातील विक्री न केलेल्या शेतकर्‍यांची नावे सात बार्‍यावरुन कमी केली असल्याने, प्रत्यक्ष वैयक्ति ताबा पावतीची मागणी केली होती. परंतु सदर माहिती देताना वैयक्तिक ताबा पावतीची माहिती न देता संपूर्ण संपादीत क्षेत्राचा पंचनामा दिला. मागणीप्रमाणे उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांनी माहिती न दिल्याने आज 928 खातेदारांचे प्रतिनिधी प्रांत कार्यालयात एकत्र आले. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत विक्री झालेली व विक्री न झालेल्या जमिनीच्या नोंदी एकत्रित करण्यात आल्याचे निदर्शनास आले. उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांनी विक्री न झालेल्या शेतजीमिनींची ताबा पावती कार्यालयाकडे नसल्याचे व तसे लेखी स्वरुपात देण्याची मान्य केले. जो पर्यंत उपविभागीय अधिकार्‍यांनी कबूल केलेले लेखी स्वरुपातले पत्र मिळत नाही तोपर्यंत कार्यालय परिसरातच उपस्थित राहण्याचे जाहीर केले. उपविभागीय अधिकारी यांनी कार्यालयाकडे विक्री न झालेल्या शेतकर्‍यांच्या सातबार्‍याची वैयक्तिक ताबा पावती नसल्याचे लेखी स्वरुपात मान्य केले.
यावेळी शेतकर्‍यांच्या वतीने राजन भगत, गंगाधार म्हात्रे, आत्मारा पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version