उत्पादन शुल्कची झाडाझडती

। पनवेल । वार्ताहर।

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री घडलेल्या हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणातील मद्यधुंद कारचालक असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुला-मुलींना दारू देणार्‍या पब्स आणि बारचालक-मालकांवर कारवाईला सुरुवात केली आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (17) वर्षीय अल्पवयीन मुलाला दारू विक्री करणार्‍या सीबीडी सेक्टर-15 मधील वाईन शॉप मालकावर कारवाई करून ताब्यात घेतले. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांनी मद्य प्राशन केल्यानंतर भरधाव कार चालवून दोघांचा बळी घेतल्याचे उघडकीस आले आहे. या अल्पवयीन मुलांनी ज्या पब व बारमध्ये दारू प्यायली, त्या पब व बारच्या आस्थापनावर उत्पादन शुल्क विभागाने दारू पुरवल्याप्रकरणी कारवाई केली आहे. दरम्यान, नवी मुंबई, पनवेलमध्ये देखील लेडीज बार आणि पबचा सुळसुळाट वाढला आहे. नवी मुंबईत गुपचूप रेव्ह पाटर्या देखील होत असून यात बहुतेक अल्पवयीन मुले मुली सहभागी होत असल्याचे यापूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत आढळले आहे.

नवी मुंबईच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संजू वाईन शॉपवर पाळत ठेवून (17) वर्षीय अल्पवयीन मुलाला दारुची विक्री करणारा व्यवस्थापक नवीन वासवानी याच्यावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. पब, बार तसेच हुक्का पार्लरमध्ये अल्पवयीन मुला मुलींना दारू पिण्यासाठी दिल्यास सदर आस्थापना चालकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

परवाना रद्द होणार
बॉम्बे प्रोव्हिबिशन कायदा 1949 आणि बॉम्बे फॉरेन लिकर नियम 1953 अंतर्गत येणार्‍या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन केल्यास सदर आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच संबंधित हॉटेल, पब आणि आस्थापनेला मद्य विक्रीबाबत देण्यात आलेले परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात येईल असा इशारादेखील देण्यात आला आहे.
Exit mobile version