महिला सक्षमीकरण उपक्रमाचा प्रारंभ

। पनवेल । प्रतिनिधी ।

भारत विकास परिषद पनवेल शाखेच्यावतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दीचे औचित्य साधून ‘महिला सक्षमीकरण’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत महिलाना शिलाई यंत्राचे वितरण करण्यात आले. तसेच, या निमित्त ‘मला उमजलेल्या अहिल्यादेवी होळकर’ या विषयावर ऑनलाईन निबंधस्पर्धा आणि पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला राज्यभरातील स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धांमधील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा नवीन पनवेल येथील डॉ. कीर्ती समुद्र यांच्या क्लिनिकमधील सभागृहात पार पडला. निबंध स्पर्धेचे परीक्षण सुलभा निंबाळकर व मानसी वैशंपायन आणि पोस्टर मेकिंग स्पर्धेचे परिक्षण संदिप मोरे व माधव अभ्यंकर यांनी केले. डॉ. शिल्पा गोडबोले, डॉ.समिधा गांधी, जयंती हळदीपूरकर व डॉ. कीर्ती समुद्र, ज्योती कोम्बतुर यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच, या निबंध स्पर्धेमध्ये डॉ.संगिता जोशी (पनवेल) यांनी प्रथम, श्रद्धा वझे (कल्याण) यांनी द्वितीय तर धनश्री केसकर (नाशिक) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. ई- पोस्टर स्पर्धेमधे निलीमा देशपांडे यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषक प्राप्त केले आहे. तर, हस्तरेखित पोस्टर स्पर्धेत त्रिशा पालव यांनी प्रथम व अमेया पाटिल यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले आहे.

Exit mobile version