सूचनाफलक लावण्याचा प्रस्ताव मांडला
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकार्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. यावेळी, रत्नदुर्ग किल्ल्यावर होत आसलेली अश्लील कृत्ये, मद्यपान व प्रेमीयुगुलांच्या रात्री-अपरात्रीच्या फेर्या थांबविण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गडसंवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आणि सविस्तर चर्चेसाठी लवकरच पुन्हा बैठक घेऊ, असे देखील सांगितले आहे.
तसेच, किल्ल्यावरील झाडाझुडपांमुळे बुरूज व ऐतिहासिक वास्तूंना होणारे नुकसान रोखण्यासाठी नियमित स्वच्छता व संवर्धनाचे उपक्रम राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. या बैठकीला गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष दीपेश वारंग, महिलाध्यक्ष मानसी चव्हाण, संपर्कप्रमुख तन्मय जाधव, गडकिल्ले सेवक दीपक रेवाले, राजा कीर, विजय कळंबटे, सचिन कळंबटे, कीर्ती धामणे, शीतल श्रीखंडे, दीपक कडोलकर, शुभांगिनी जाधव, शशिकांत जाधव, स्वयम नायर, संध्या कोसुंबकर यांसह अनेक गावकरी व संघटनांचे सदस्य उपस्थित होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जयदीप साळवी, धर्मजागरण दक्षिण रत्नागिरी संयोजक विजय यादव, हिंदू महासभेचे अध्यक्ष श्रीकांत मराठे आदींनी या कार्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले आहे.
सूचनाफलक लावण्याचा प्रस्ताव
रत्नदुर्ग किल्ल्याच्या पवित्र वास्तूत होत असलेल्या अश्लील व व्यसनाधीन प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी नियमित पोलिस गस्त व कडक कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. रात्री-अपरात्री किल्ल्यावर होणार्या प्रेमीयुगुलांच्या फेर्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तसेच, गडकिल्ल्याच्या परिसरात गडाचा ऐतिहासिक वारसा व नियमांचे महत्त्व पटवून देणारे सूचनाफलक लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
आंदोलनाचा इशारा
रत्नदुर्ग किल्ला संवर्धनाबाबत संस्थेचे संस्थापक योगेश सोनवणे यांनी कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले की, या विषयावर योग्य ती उपाययोजना लवकरात लवकर न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातून जनआंदोलन उभे केले जाईल. ही बैठक रत्नदुर्ग किल्ल्याच्या पवित्र वास्तूच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून, यासाठी लवकरच अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे.