कचरा मुक्तीसाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार

प्लास्टीक संकलन शेड, शोषखड्डा उभारणीचे काम सुरु

। अलिबाग। प्रतिनिधी ।

गावांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न देखील गंभीर होत आहे. काही जण रस्त्याच्या बाजूला, तर काही जण शेतांमध्ये कचरा टाकत आहेत. या कचर्‍यामुळे पावसाळ्यात पुरपरिस्थिती बरोबरच दुर्गंधीमुळे वेगवेगळे आजार होण्याची भिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहवे. कचर्‍यांमुळे होणारे आजार उद्भवू नये यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे.

रायगड हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील नागाव, आक्षी, काशीद, रेवदंडा या पर्यटन स्थळांबरोबरच रोहा, माणगाव, महाड अशा अनेक तालुक्यांमध्ये ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. गावांमधील या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. हॉटेल, कॉटेजेस व्यवसायिकांना यातून उभारी मिळते.

वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच पर्यटनामुळे गावांचा विस्तार वाढत आहे. नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. मात्र अनेक गावांतील कचरा रस्त्याच्या दुतर्फा अथवा मिळेल, त्या मोकळ्या जागेत टाकला जातो. या कचर्‍यामुळे रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे आजार निर्माण होण्याची भिती झाली आहे. पावसाळ्यात हा कचरा नाल्यात अडकून राहिल्यास पुराचा धोका असल्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कचर्‍यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. शहरी भागासह कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न गंभीर होत आहे.

 कचरा भुमीचा अभाव असल्याने कचर्‍याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यास ग्रामपंचायत उदासीन ठरत आहेत. कचरा हा चिंतेचा विषय बनला आहे. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत गावागावात कचर्‍याचे व्यवस्थापन करण्याची सुचना केली. कचर्‍याची कोंडी सोडविण्यासाठी कंपोस्ट पीट हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये कंपोस्ट पीट उभारण्याचे काम करण्यात आले आहे. या कंपोस्ट खतामध्ये कचरा टाकून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच प्लास्टीकमुळे होणार्‍या परिणामावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्लास्टीक संकलन शेड उभारणीदेखील जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये केली जात आहे. तसेच जिल्ह्यातील गावांमध्ये जागेचा प्रश्‍न गंभीर होत आहे. सांडपाण्याचे नियोजन होत नसल्याने अनेक वेळा दुर्गंधीचा प्रश्‍न निर्माण होतो. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी गावागावात  शोषखड्डा उभारण्याच्या सुचना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. जागा उपलब्ध नसल्याने पाच ते सहा जणांनी एकत्र येऊन शोष खड्डा उभारण्याचे सांगण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील गावांमधील कचरा, सांडपाणी प्रश्‍न लवकरच मार्गी लागण्याची  शक्यता आहे.

स्वच्छतेचा संदेश
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांमध्ये कंपोस्ट पीट उभारले जात आहेत. विटांनी मजबूत असा बांधल्या जात असलेल्या कंपोस्ट पीटांना रंग रंगोटी करून त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संदेश लिहले जात आहेत. त्यात संडास बांधा घरोघरी, आरोग्य नांदी त्यांचे दारी, स्वच्छ घर, सुंदर परिसर, शोषखड्याचा करूया वापर, स्वच्छतेची आवड सुंदरतेची निवड, स्वच्छ सुंदर परिसर, आरोग्य नांदेल निरंतर अशा अनेक प्रकारचे स्वच्छतेचे संदेश या कंपोस्ट पिटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करून जनजागृती केली जात आहे.

Exit mobile version