डासांची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना सुरु
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ गावात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सूचनेनुसार नेरळ ग्रामपंचायत कडून डेंग्यूचे डासांची साखळी तोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.नेरळ ग्रामपंचायत रस्त्यावर उतरून धूर फवारणी आणि स्वच्छता कामांसाठी आग्रही असल्याची दिसून आली. दरम्यान नेरळ गावात डेंग्यूचे चार संशयित रुग्ण असून दोन रुग्ण उपचार घेवून विश्रांती घेत आहे.तर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून डेंग्यू सदृश रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेनर सर्वे सुरू आहेत.
नेरळ गावात 13 सप्टेंबर रोजी डेंग्यू झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला होता.त्याच भागातील सहा व्यक्ती डेंग्यू सदृश आजाराने त्रस्त आहेत. त्यातील दोन संशयित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेवून घरी परतले असून त्यातील एक रुग्ण आपल्या गावी उत्तर प्रदेश येथे विश्रांती साठी पोहचला आहे.आज नेरळ मध्ये चार डेंग्यू सदृश रुग्ण असून त्यात दोन रुग्ण नेरळ गावातील खासगी रुग्णालयात तर एक रुग्ण खोपोली येथील रुग्णालयात आणि एक महिला रुग्ण अन्य खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.