वांगणीमध्ये जखमी सांबर मादीला जीवदान

वनविभाग व पाणवठा अनाथाश्रमाची कामगिरी
। पाली/बेणसे । वार्ताहर ।

जंगलातून रस्ता चुकलेली व कुत्रे मागे लागल्याने घाबरलेली सांबराच्या प्रजातीची जखमी मादी कर्जत जवळील वांगणी गावातील कमलाकर जांगरे यांच्या घरात शिरली होती. घरात शिरलेला प्राणी पाहून सर्वांची एकच तारांबळ उडाली. मात्र या मादीला वनविभाग व पाणवठा प्राणी अनाथाश्रमाचे संचालक गणराज जैन व सदस्यांनी सुखरूप सोडवून उपचार करून सुरक्षित जंगलात सोडले आहे.
यावेळी ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवून वनविभागाला या घटनेची त्वरित माहिती दिली. वन विभागाचे राऊंड अधिकारी श्रीकांत राऊत यांनी त्यांच्या टिम सहीत घटनास्थळी धाव घेतली. या प्राण्याची पाहणी केली असता त्यांना ती जखमी झाल्याचे निदर्शनास आले. तिच्यावर योग्य उपचार करता यावे व सांभाळ करण्यासाठी चामटोली-बदलापूर येथील पाणवठा या अपंग प्राण्यांच्या अनाथाश्रमाचे संचालक गणराज जैन यांच्याशी संपर्क केला. जैन यांनी त्वरीत पाणवठाच्या काही सदस्यांना घटनास्थळी पाठवले. वनविभागाचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व पाणवठा अनाथाश्रमाचे सदस्य या सर्वांनी तिला सुखरुपपणे पाणवठा अनाथाश्रमात दाखल केले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती म्हात्रे यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनतर पुर्णतः स्वस्थ झालेल्या या गोंडस प्राण्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले व वनविभागामार्फत तिला तिच्या नैसर्गीक आधिवासात परत सोडण्यात आले.
यावेळी गणराज जैन, डॉ. अर्चना जैन व त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाणवठा आश्रमाचे सदस्य नितीन कांबळे, दत्ता लोहकरे, आकाश हिंदोळा, प्रथमेश त्रिभुवन, प्रसाद दळवी, हेमश्‍वेता पांचाळ, रोहीत गोविलकर, प्रकाश थापा तसेच वनविभागाचे अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ संसारे व अनेक ग्रामस्थ या सर्वांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली आहे.


रस्ता चुकेलेल्या वन्यप्राण्यांवर गैरसमुजत व जनजागृती अभावी काही गैरप्रकार होतात मात्र याठिकाणी असे काही झाले नाही. उलट स्थानिक लोकांनी दाखविलेली सतर्कता व वनविभाग आणि पाणवठाच्या टीमने घेतलेली मेहनत यामुळे या भरकटलेल्या जीवाचे प्राण वाचले आहेत. – गणराज जैन, संचालक, पाणवठा प्राणी अनाथाश्रम

Exit mobile version