प्राचार्यांनी भेदभाव केल्याचा गंभीर आरोप
। वावोशी । वार्ताहर ।
भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचालित बी.एन.एन. महाविद्यालयात मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा रावळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांविषयी भेदभावाची भूमिका घेतल्याचा आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेने केला आहे.
बहुजन विद्यार्थी संघटनेच्या म्हणण्यानुसार, इयत्ता 11वीमध्ये अनुदानित तुकड्यांमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना इ. 12 वी प्रवेशाच्या वेळी विना-अनुदानित तुकड्यांमध्ये वर्ग करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर अनावश्यक आर्थिक बोजा पडला असून, शिक्षणाच्या संधींपासून ते वंचित राहत आहेत. संस्थेचा उद्देश मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी असताना, त्याच समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणे गंभीर बाब आहे. संघटनेने आरोप केला आहे की, यापूर्वी संस्थेने कधीही मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेतले नव्हते किंवा त्यांना विना-अनुदानित तुकड्यांमध्ये टाकले नव्हते. मात्र, प्राचार्य डॉ. रावळ यांच्या कार्यकाळात या विद्यार्थ्यांवर अन्याय सुरू झाल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.