| माणगाव | प्रतिनिधी |
महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवते. मात्र, माणगाव नगरपंचायत लाडक्या बहिणींनाच कामावरून कमी करते. अशा तीव्र भावना नगरपंचायतीतून अचानक कमी करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केल्या आहेत. यावेळी बोलताना ज्ञानदेव पवार यांनी नगरपंचायतीतून कमी केलेल्या महिला कर्मचाऱ्यांना कामावर घ्या, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
माणगाव नगरपंचायतीतील दि.1 नोव्हेंबरपासून आतापर्यंत नऊ कर्मचाऱ्यांना केवळ तोंडी सांगून कामावरून कमी करण्यात आले होते. यापैकी पाच कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वी कामावर पुन्हा रुजू करून घेण्यात आले असून चार महिला कर्मचाऱ्यांना तुमचे काम असमाधानकारक असल्याचे सांगून कामावरून कमी करण्यात आले आहे. अचानकपणे कमी केलेल्या या महिलांना एक प्रकारे मानसिक धक्का बसला असून या महिलांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या महिलांना न्याय मळािवा, अशी मागणी सर्वस्तरांतून जोर धरू लागली आहे. याबाबत बुधवारी (दि.19) माणगाव शासकीय विश्रामगृहात ज्ञानदेव पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला नगरपंचायतीतील अन्यायग्रस्त महिला कर्मचारी सोनाली पवार, वैभवी तळकर-खैरे, सिद्धी पवार, ऋतुजा निंबाळकर यांच्यासह नितीन दसवते, प्रसाद धारिया, सौरभ खैरे, प्रवीण बागवे, मनोज पवार व अभिजित पवार आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की, माणगाव नगरपंचायतीतील महिला कर्मचारी यांना कामावरून काढून टाकून नगरपंचायतीने त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय केला आहे. यापूर्वीदेखील अन्याय झालेल्या महिलांना वेळोवेळी तुम्हाला कामावरून काढून टाकू, अशी धमकी दिलेली आहे. त्यानंतर कमी करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांना दि. 31 ऑक्टोबर रोजी अचानक मुख्याधिकारी यांच्या सूचनेवरून उद्यापासून कामावर येऊ नका, असे सांगिण्यात आले. या महिलांनी आम्हाला अचानक का कमी करताय, असा प्रश्न विचारल्यावर सबंधित प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे या महिला कर्मचाऱ्यांना नगरपंचायतीने कामावर रुजू करून न घेतल्यास येत्या चार-पाच दिवसांत आंदोलन करतील, असा इशारा पवार यांनी दिला आहे.






