शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांवर अन्याय- सुप्रिया सुळे

। मुंबई । प्रतिनिधी ।
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक असून, राज्याच्या स्त्रीशक्तीवर हा अन्याय आहे, अशी थेट टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. आज 39 दिवसांनंतर शिंदे सरकारच्या 18 लोकांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खासदार सुळे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याची आठवण भाजपला करुन दिली आहे.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत, तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात, असं ते सांगतात. मात्र, आज राज्यात मंत्रिमंडळाच्या झालेल्या शपथविधीत 18 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही, याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

उशिरा का होईना, पण महाराष्ट्राला मंत्रीपद मिळालं. आता सरकारने राज्यातील जनतेच्या अडचणी सोडवाव्यात. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत. पण, काही प्रकरणात ज्या लोकांना अजून क्लीनचीट मिळाली नाही, अशा लोकांची नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं.

अजित पवार, विरोधी पक्षनेते


पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणार्‍या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला, तरीही त्याच्याविरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्यायदेवतेवर विश्‍वास आहे. ‘लडेंगे जितेंगे’

चित्रा वाघ, भाजप नेत्या

मित्रपक्षांशिवाय सरकार चालत नाही, निश्‍चित त्यावर निर्णय होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता. मात्र, आता काही तांत्रिक कारण असेल, त्यामुळे अपक्षांना मंत्रीपद देण्यात आले नाही. कधी कधी दोन पावलं मागे यावं लागतं. त्यामुळे मी अजूनही त्यांच्या शब्दावर विश्‍वास ठेवतो.

आ. बच्चू कडू

पुरुषप्रधान मंत्रिमंडळ!
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराचा समावेश नाही. त्यामुळे शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ पुरुषप्रधान असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या आमदार यामीनी जाधव, लता सोनवणे यांनी शिंदे गटात सामील झाल्या होत्या. त्यामुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तसेच, भाजपच्या गोटातून मंदा म्हात्रेंची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, मंत्रिपदी वर्णी लागणार्‍या फायनल आमदारांच्या यादीत एकाही महिला आमदाराचं नाव नसल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

Exit mobile version