परप्रांतिय भरतीमुळे स्थानिक कामगांरावर अन्याय

तीन टप्प्यात छेडणार आंदोलन

| उरण | वार्ताहर |

तालुक्यातील पागोटे येथे सेंट्रल वेअर हाउसिंग कार्पोरेशन ही कंपनी कार्यरत आहे. पूर्वी स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य दिले जायचे. आता मात्र गेल्या 30 वर्षापासून काम करत असलेल्या कामगारांना डावलण्यात आले आहे. कंपनी प्रशासनाने तातडीने 250 कामगारांना कामावर हजर करुन घ्यावे. अन्यथा 20 नोव्हेंबरपासून साखळी उपोषण करण्यात येईल. तसेच प्रश्न सुटला नाही तर, 27 नोव्हेंबरपासून बेमुजत उपोषण करण्यात येणार आहे. पुढे आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यासाठी 29 नोव्हेंबरपासून कुटुंबासह आंदोल छेडण्यात येणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

आजपर्यंत कंपनीत अनेक विविध ठेकेदार आले गेले परंतु सीडब्ल्युसी वेअरहाऊसमध्ये स्थानिक कामगार काम करत होते. याबाबत कंपनी प्रशासनाला पुर्णतः माहित आहे. कंपनीच्या वेअरहाऊसमध्ये बजट टर्मिनल सीएफएस प्रा. लि. या कंत्राटदार कंपनीने लोडींग-अनलोडींगचे काम 19 फेब्रुवारी रोजी सुरू केले आहे. सदर काम सुरू करतेवेळी पागोटे व पाणजे गावातील प्रकल्पग्रस्त असलेले सर्व कामगार कामावरती रूजु करून घेण्यात आले. ही सकारात्मक बाब आहे, याचे स्थानिक कामगारांना समाधान आहे. परंतु या व्यतिरीक्त 100 पेक्षा अधिक जे कामगार परप्रांतिय भरण्यात आले आहेत, जे कामगार यापुर्वी या वेअरहाऊसमध्ये कधीही काम केलेले नाही, अशा परप्रांतिय कामगारांची भरती केल्यामुळे स्थानिकांवर अन्याय झाल्याची धारणा आहे.

ज्यावेळी कंपनीने काम सुरू केले. त्याअनुषंगाने झालेल्या बैठकीमध्ये कामाच्या स्वरूपात जशी वाढ होत जाईल त्या प्रमाणामध्ये उर्वरीत कामगारांना कामावर घेतले जाईल, असे आश्वासन कामगारांना दिले होते. मागण्या पूर्ण होत नसल्याने कामगारांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, विभागीय कामगार आयुक्त, पोलीस आयुक्त नवी मुंबई, तहसीलदार उरण, सहाय्यक पोलीस आयुक्त न्हावा शेवा पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे, सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून स्थानिक कामगारांना नोकरीत सामावून घेण्याची विनंती केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा कामगारांनी प्रशासनाला दिला आहे.

कंपनीला आर्थिक नफा अधिक व्हावा या उद्देशाने सीडब्लूसी कंपनी प्रशासन कामगांराच्या मागण्यांकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत आहे. नोकरभरती जाणून बुजून केली जात नाही. कामगांरावर अन्याय होत आहे, तरी याप्रकरणी संबंधित केंद्र व राज्य सरकारच्या सर्व अधिकारी पदाधिकारी तसेच या तालुक्यातील पदाधिकारी, सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन आम्हा कर्मचाऱ्यांना न्याय दयावा ही विनंती.

राजेंद्र मोहिते, यूनियन अध्यक्ष

कामगारांच्या मागण्याशी आमचा कोणताही संबंध नाही. कामगारांचा प्रश्न कंपनीच्या प्रशासनाशी निगडित आहे. वाशी येथे मुख्य कार्यालय आहे. त्यांनी कंपनी प्रशासन वाशी व दिल्ली येथे मागण्या व पत्रव्यवहार करावा. सदर कामगारांचा प्रश्न कधीही न सुटणारा आहे. हा प्रश्न कधीच सुटू शकत नाही.

निखिल भंडारी, ठेकेदार, सीडब्लूसी, पागोटे
Exit mobile version