दापोलीत शिवसेनेला संपविण्याचा डाव

शिवसेना बंडखोर,राष्ट्रवादीची छुपी आघाडी
खेड । प्रतिनिधी ।
दापोली विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना राष्ट्रवादीची झालेली आघाडी ही सेनेतीलच बंडखोरांनी केलेली हातमिळवणी असल्याची चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक पातळीवरील सेना व राष्ट्रवादी चे पदाधिकारी या आघाडीबाबत अद्यापही संभ्रमात असून गेली काही वर्ष पक्ष विरोधात काम केलेल्या लोकांसोबत नगरपंचायत निवडणुकीमध्ये सक्रियपणे काम करण्यासाठी हे पदाधिकारी तयार नसल्याचे चित्र दिसत आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघांमध्ये दापोली मंडणगड या दोन ठिकाणी नगरपंचायत निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये सेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होईल अस वाटत असताना शिवसेनेतील बंडखोर अशी ओळख मिळवलेले माजी आमदार संजय कदम व माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी हातमिळवणी करत राष्ट्रवादी व शिवसेनेची आघाडी झाल्याचे जाहीर केले आहे. दापोली विधानसभा मतदार संघात तत्कालीन शिवसेना आ. दळवी यांच्या विरोधामध्ये बंड करून तत्कालीन शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय कदम यांनी राष्ट्रवादी चे घड्याळ हाती बांधले. याचे प्रमुख कारण जिल्हापरिषद मध्ये कार्यरत असताना संजय कदम व सुर्यकांत दळवी यांच्या मध्ये जिल्हापरिषद अध्यक्ष पदावरून झालेला टोकाचा संघर्ष हेच होत. दळवी यांनी घेतलेल्या एकतफी निर्णया मुळेच संजय कदम यांनी त्यावेळी बंडखोरी केली. या निवडणुकीत सूर्यकांत दळवी यांचा नाकर्तेपणा संजय कदम यांनी ओरडून-ओरडून जनतेसमोर सांगितला. गोडबोले आमदार असा उल्लेख गावागावात करून दळवींची गोडबोले आमदार म्हणून बदनामी केली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सूर्यकांत दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पराभूत झाल्यानंतर सूर्यकांत दळवी यांनी संजय कदम यांना विजयाचे श्रेय देण्यापेक्षा स्वपक्षीय नेते आपल्या पराभवाला कारणीभूत असल्याचा आरोप करीत शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली होती.

सन 2014 ते 2019 या कालावधीत राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेबरोबर कडवी झुंज देत दापोली व मंडणगड मध्ये आपली घोडदौड सुरू ठेवली होती. सूर्यकांत दळवी मात्र संजय कदम यांचा अश्‍व रोखण्याऐवजी शिवसेनेतील नेत्यांवर तोंडसुख घेत होते. या प्रकाराने अस्वस्थ असलेल्या शिवसैनिकांना नगरपंचायत, जिल्हापरिषद व पंचायत समिती आणि सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी सेनेला राष्ट्रवादीसोबत कडवा संघर्ष करावा लागला. या संघर्षात देखील सूर्यकांत दळवी यांनी शिवसैनिकांचे नेतृत्व न करता या निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार योगेश कदम यांच्या अडचणी वाढविण्यासाठी प्रयत्न केला परंतु तरीदेखील शिवसेनेने या निवडणुकीत यश मिळवले. सेनेच्या या विजयो उत्सवांमध्ये देखील सूर्यकांत दळवी कुठेही दिसले नाहीत. उलटपक्षी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या बातम्या सूर्यकांत दळवी यांच्या कडून सातत्याने येत होत्या.
शिवसेनेतून बंड केलेले संजय कदम हे राष्ट्रवादी स्थिरावले असले तरी बंडाचा झेंडा गेल्या सात वर्षापासून हातात धरून वावरत असलेले सूर्यकांत दळवी हे कधी भाजपाच्या नेत्यांसोबत तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत व्यासपीठावर आढळून आले आहेत. शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललेले संजय कदम यांची मात्र त्याच भूमिकेतून वाटचाल सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर देखील व राज्य पातळीवर शिवसेना – राष्ट्रवादी आघाडीला झाल्यावर देखील माजी आ.कदम यांनी त्यांच्या भूमिकेत तसूभरही बदल केलेला आढळून आला नाही. परंतु राज्यपातळीवर झालेल्या आघाडी मूळे माजी आ.कदम यांना खर्या अर्थाने नवसंजीवनी मिळाली यात शंका नाही. त्यामुळे गेली अनेक वर्ष बंडाच्या पवित्र्यात असलेले दळवी आणि दापोली विधानसभा मतदार संघात सेना औंषधाला सुद्धा ठेवायची नाही असा आत्मविश्‍वास बाळगून काम करणारे माजी आमदार संजय कदम
असे दोघे मिळून मतदार संघातील सेनेचे अस्तित्व संपुष्टात आणणार अशी चर्चा दापोली मतदार संघात सुरु आहे.

Exit mobile version