कशेळे हद्दीत बेसुमार जंगलतोड

वनविभागाचे दुर्लक्ष, पर्यावरणप्रेमींकडून नाराजी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील कशेळे परिसरात अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स या भागातील कशेळे-खांडस रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात खासगी जंगल तोडण्यात आले आहे. मात्र, हे जंगल तोडण्यात येत असताना ते जंगल तोडण्यासाठी परवानगी घेणार्‍या ठेकेदाराने चक्क त्या रस्त्याच्या कडेला असलेली झाडेदेखील तोडून टाकली आहेत. याप्रकरणी वन विभागाने त्या ठेकेदाराला दिलेल्या झाडांची माहिती घेण्याची गरज निर्माण झाली आहे, असे आता तेथील जंगलतोड पाहिल्यानंतर पर्यावरणप्रेमी बोलू लागले आहेत.

कशेळे खांडस रस्त्यावर अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स ही संस्था असून, या संस्थेच्या समोरच्या बाजूला खासगी क्षेत्र आहे. त्या भागातील जमिनीमध्ये असलेली झाडे तोडण्याचा परवाना संबंधित शेतकर्‍यांनी मिळविला आणि त्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून झाडे तोडण्याचे काम सुरु आहे. प्रामुख्याने 20 वर्षे जुनी झाडे तोडणायची परवानगी वनविभाग संबंधित शेतकरी यांना देत असते. मात्र, त्या भागात लहान-मोठी सर्व झाडे तोडण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. त्यातही पुढे जाऊन संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या बाजूला असलेली झाडेदेखील छाटून टाकली आहेत. त्यामुळे संबंधित शेतकरी आणि ठेकेदार यांना वन विभागाने नेमकी कोणती झाडे तोडण्यास परवानगी दिली होती, याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे झाडे वाढविण्यासाठी मोठा कालावधी जात असतो, त्यामुळे त्या खासगी जमिनीमध्ये झाडे तोडली जात असताना वन विभागाने आपले कर्मचारी तेथे उपस्थित ठेवण्याची गरज होती.

दरम्यान, जंगल तोडले जात असताना वन कर्मचारी तेथे उपस्थित नसल्याने कदाचित लहान झाडेदेखील तोडण्यात आली असावीत, अशी शक्यता आहे. मात्र, वन विभागाच्या दुर्लक्षपणामुळे अनेक लहान झाडे तोडली गेली आहेत. त्याबाबत आणि रस्त्याच्या बाजूने असलेली झाडेदेखील तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Exit mobile version