तळा येथील फॉरेस्ट हिल रिसॉर्टची चौकशी

शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळांची मागणी

| तळा | वार्ताहर |

तालुक्यातील फॉरेस्ट हिल रिसॉर्ट पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. या रिसॉर्टमध्ये अनधिकृत व्यवसाय चालत असल्याचा आरोप करत या रिसॉर्टची चौकशी करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ यांनी केली आहे. फॉरेस्ट हिलजवळ काही वर्षांपूर्वी मृत बिबट्या आढळून आला होता. विशेष म्हणजे, त्या बिबट्याची नखे गायब होती. वन्यप्राण्यांना मारणे आणि मारल्यानंतर त्याचे अवयव काढणे याबाबत येथील कर्मचार्‍यांवर गुन्हादेखील नोंदवण्यात आला होता. या जागेवर व्यावसायिकदृष्ट्या रिसॉर्ट चालवणे अधिकृत आहे का? त्या ठिकाणी बांधण्यात आलेली घरे हॉटेल ही डोंगराच्या अगदी किनार्‍याला असल्याने ती धोकादायक तर नाहीत ना? या बांधण्यात आलेल्या घरांसाठी परवानगी काढली आहे का? बाजूलाच वन्यप्राणी असल्याने येथे येणार्‍या पर्यटकांना त्यापासून धोका नाही ना? त्याचप्रमाणे रात्रभर चालणार्‍या डीजेच्या आवाजाने वन्यप्राण्यांना हानी तर पोहोचत नाही ना? यासाठी योग्य त्या परवानग्या घेतल्या आहेत की नाही? अशा अनेक मुद्द्यांवर तळा शिवसेनेने रिसॉर्टच्या विरोधात आपले दंड थोपटले आहेत. तळा शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ म्हणाले की, अवैध कामासाठी ही कंपनी स्थानिक कर्मचार्‍यांचा वापर करते तसेच डिस्को करणे, कर्कश्य आवाजात डीजे वाजवणे, याबाबत अनेकांच्या तक्रारी आमच्या शिवसेना शाखेत आल्या असल्या कारणाने आम्ही तळा फॉरेस्ट हिलविरोधात तक्रार केली असल्याचं तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ यांनी सांगितलं.

Exit mobile version