समाज मंदिराच्या बांधकामाच्या चौकशी करा

रहिवाशांची मागणी
। उरण । वार्ताहर ।

उरण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या समाज मंदिराचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समजते. तरी याची चौकशी होऊन ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
14 व्या वित्तायोगाच्या अनुदानातून नगरपालिकेच्या मालकीच्या बौद्धवाडा उरण येथील सर्व्हे नंबर 606 या जागेत समाज विकास केंद्र 3,86,11,588 रकमेचे बांधकाम उभारणीचे काम मेसर्स महादेव एंटरप्राईजेस, उरण यांना देण्यात आले आहे. काम सुरू असताना ठेकेदाराने देखरेख करण्यासाठी स्वतःचे सुपरवायझर, अभियंते यांची नेमणूक करणे आहे. तसेच नगरपरिषदेचे सुपरवायझर, ओव्हरसियर/अभियंता यांची देखरेख करणे बंधनकारक होते.कामांचा दर्जा मान्यता प्राप्त एजन्सीकडून तपासून घेऊन अहवाल सादर करणे आवश्यक आहे. असे असतानाही या नियमांचे उल्लंघन करून ठेकेदाराकडून बांधकाम सुरू आहे.

ठेकेदाराने स्लॅब टाकण्याचे काम हे अंधार्या रात्री केले होते. याबाबत नगरपालिकेचे इंजिनिअर अधिकारी झुंबर माने यांच्याकडे याची विचारणा केली असता त्यांनी याची विचारणा ठेकेदाराकडे केली होती. स्लॅबचे काम सुरू असताना त्याठिकाणी कोणतेही अधिकारी वर्ग उपस्थित नसल्याचे दिसून आले. तसेच इतर मटेरियल ही निकृष्ट दर्जाचे असल्याचे समजते तरी याची सखोल चौकशी करून दोषी असल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version