आंदोलनकर्त्यांसमवेत चर्चा
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
बारसू, ता.राजापूर भागात महाराष्ट्र शासनाच्या अधिकार्यांनी तेथे जमीन प्रमाणाबाहेर घेतली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. अनधिकृत जागेत जमीन घेतली असेल तर त्यांना निलंबित करण्यापर्यंतची कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.
बारसू येथे रिफानयरी प्रकल्प होऊ नये याकरता ग्रामस्थांसह राजकीय नेत्यांनीही कडाडून विरोध केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोकणात गंभीर वातावरण निर्माण झाले असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत आज बैठक घेतली. या बैठकीत खा. विनायक राऊत, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतरावही उपस्थित होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचे आज उदय सामंतांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.
यावेळी या परिसरात काही जमिनी खरेदी केल्या आहेत, यामध्ये शासनाचे काही अधिकारी आहे, असं खासदारांनी आणि आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. त्यावर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली असल्याचे सामंत यांनी जाहीर केले. 2 किंवा 3 मे रोजी विस्तारीत बैठक मुंबईत करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे, असं सामंत म्हणाले.
गुन्हे लावणार नाही
या प्रकरणात प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे होते, अशी सर्वांची अपेक्षा होती. आम्ही चार पाऊल पुढे टाकले आहेत. आंदोलनकर्त्यांना शंका होती की 353 सारखी गुन्हे लावली जातील, असे गुन्हे लावणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
ठाकरेंच्या शंकांचे निरसन करणार
उद्धव ठाकरे यांनाही जर माहिती आवश्यक असेल तर त्यांची वेळ घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, आयुक्त त्यांच्याशी बोलतील. त्यांच्या शंकांचं निरसन करायचं असेल तर, आजपर्यंत जी कारवाई झाली, दडपशाही झाली त्याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंना केलं जाईल. शरद पवारांना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनीही माहिती दिलेली हे ब्रिफिंग केलं आहे. अजित पवारांनाही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
सत्यजित चव्हाण यांच्याशी चर्चा
आजही रत्नागिरी जिल्ह्यात येऊन सांगतोय की शेतकर्यांना त्रास द्यायचा नाही. मातीचं परीक्षण झाल्यानंतर प्रकल्प येणार की नाही येणार यावर शिक्कमोर्तब होणार आहे. अत्यंत संयमाने आज चर्चा झाली आहे. कालदेखील सत्यजित चव्हाण यांच्याशीही चर्चा झाली आहे. हा प्रकल्प रेटून पुढे न्यायचा नाही. सगळ्यांचं समाधान करून, शेतकर्यांना न्याय देऊन प्रकल्प पुढे न्यायचा आहे, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.