| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील आंबेवाडी ते निवी बहुचर्चित कालव्याला यावर्षी डिसेंबर हंगामापासून सुरळीत पाणी सोडण्यात यावे. गेल्या वर्षी मे अखेर कालव्याला सोडलेला पाणी ही केवळ तालीम होती. दुरुस्ती कामे पूर्ण न झाल्याने पाणी वेळेत सोडता आले नाही. हे प्रशासनाचे धडधडीत अपयश होते. तरी विभागीय शेतकरी, ग्रामस्थांनी समजून घेतले. तसे आता अजिबात खपवून घेणार नाही, असा गंभीर ईशारा गुरुवारी (दि.25) आंदोलनकर्ते बळीराजा फांऊडेशनच्या शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच, कोणतीही सबब न देता डिसेंबर हंगामापासून कालव्याला पाणी सोडण्यात यावे, असे निवेदन बळीराजा फांऊडेशनने कोलाड पाटबंधारे प्रशासनाला दिला आहे. यावेळी कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक भूमिका व्यक्त केली.
आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी विभागीय शेतकऱ्यांनी अविरत लढा दिला. प्रचंड संघर्ष केला. सलग सहा-सात वर्षे आंदोलन, आमरण उपोषण, आत्मदहनाचा ईशारा, पाण्याचा जागर असे व्यापक मोहीम उपक्रम सातत्यपूर्ण केले. विधिमंडळात पाणी प्रश्न उपस्थित झाला. अखेर संबंधीत विभागाने कालवा दुरुस्तीसाठी निधी देत आजगायत करोडो रुपयांची दुरुस्ती कामे मार्गी लागली. जवळपास 80 टक्के दुरुस्ती कामे मार्गी लागली. मे अखेर शेवटचा टप्पा निवीपर्यंत पाणी आणण्यात बळीराजा फांऊडेशनला यश आले. आता डिसेंबर हंगामीपासून कालव्याला सुरळीतपणे पाणी सोडण्यात यावे, त्यादृष्टीने कालव्याची प्रलंबीत दुरुस्ती कामे, साफसफाई करण्यात यावी, पाणी सोडण्याला अजिबात दिरंगाई नकोत, कोणतीच सबब नकोत, असे स्पष्ट निवेदन बळीराजा फांऊडेशनच्या माध्यमातून उप कार्यकारी अभियंता अतुल आगवणे यांना देण्यात आले.







