अवैध मासेमारी रोखण्यासाठी नौकांची तपासणी

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यात पावसाळी बंदीनंतर सुरू होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने कठोर पावले उचलली आहेत़ सर्व मासेमारी नौका बंदरांमध्ये, जेटीवर उभ्या करण्यात आलेल्या आहेत़ या नौकांची नावे आणि क्रमांक घेऊन ते कार्यालयातील विविध परवान्यांच्या नोंदीमध्ये तपासले जाणार आहेत़ ज्या नौकांचे नाव व क्रमांक नोंदी नसतील अशा नौका शोधून कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मासळी उतरविण्याची 46 ठिकाणे आहेत़ जिल्ह्यात एकूण 3,077 यांत्रिकी आणि 442 बिगर यांत्रिकी नौका आहेत़ या अधिकृत नौकांव्यतिरिक्त इतर अनधिकृत नौका आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी आणि पर्यायाने अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने उभ्या असलेल्या नौकांचे नाव आणि क्रमांक घेण्याचा निर्णय घेतला आहे़ तशी सूचना सर्व अधिकार्‍यांना करण्यात आली आहे. नौकेचे नाव आणि क्रमांकाच्या नोंदी मत्स्य व्यवसाय विभागाच्या दप्तरी नसतील त्या नौका अवैध आहेत, हे स्पष्ट होणार आहे़ त्यानुसार कारवाई करणे अधिकार्‍याना सुलभ होणार आहे़.
मत्स्य व्यवसाय विभागाच्या या नियोजनानुसार ज्या नौका अनधिकृत आढळून येतील त्यांची माहिती मच्छिमार सहकारी संस्थांना कळविण्यात येणार आहे. काही बेकायदेशीर नौका अशा संस्थांचे सदस्य असल्याचा संशय आहे़ त्या नौकांना सवलतीचे डिझेल दिले जाऊ नये, असे मत्स्य व्यवसाय विभागाकडून कळविले जाणार आहे़ इतकेच नव्हे तर ज्या संस्थांनी कोणत्याही अनधिकृत किंवा बेकायदेशीर नौकांना सवलतीचे डिझेल पुरविले असेल आणि त्याचा परवाना घेतला गेला असेल तर त्या नौकामालकाला राहिलेला आणि पुढचा डिझेल परतावा दिला जाणार नाही, अशी नोटीस बजावली जाणार आहे़.

Exit mobile version