समितीकडून समाधान, सुधारणा सुचविल्या
| कर्जत | प्रतिनिधी |
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक’ अभियानांतर्गत सर्व्हेक्षण समितीने कर्जत एसटी आगाराला अचानक भेट देत कामकाजाची पाहणी केली. आगाराच्या स्वच्छता व व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त करत समितीने पुढील सुधारण्यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या.
कर्जत येथील एसटी आगाराची ‘स्वच्छ, सुंदर बस स्थानक’ अभियानांतर्गत सर्व्हेक्षण समितीने मंगळवारी सकाळी अचानक पाहणी केली. या भेटीत आगार परिसर, प्रवासी सुविधा तसेच कार्यालयीन कामकाजाची सखोल तपासणी करण्यात आली. पालघर विभागाचे विभाग नियंत्रक कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती दुपारी कर्जत आगारात दाखल झाली. समितीत विजय पवार, विजय मांडे तसेच प्रवासी प्रतिनिधी पुंडलिक भोईर यांचा समावेश होता.
यावेळी सहाय्यक वाहतूक नियंत्रक महादेव पालवे यांनी समितीचे स्वागत केले. समितीने वाहतूक नियंत्रक दीपक देशमुख, विलास बागुल आणि वसंत बागुल यांच्या उपस्थितीत संपूर्ण आगार परिसराची पाहणी केली. स्वच्छतागृहांची स्वच्छता, प्रवासी निवारा, सीएनजी पंपाची सुविधा तसेच कार्यालयातील मांडणी याबाबत समितीने सकारात्मक अभिप्राय दिला. नेरळ बस थांब्याचीही पाहणी करण्यात आली.
यावेळी आगार व्यवस्थापकांचे निवासस्थान आणि इमारतींच्या दुरुस्तीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. कमी मनुष्यबळ असूनही आगाराचे कामकाज चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे नमूद करत समिती सदस्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. समिती अध्यक्ष कैलास पाटील यांनी प्रवासी संख्या वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तर, सहाय्यक वाहतूक नियंत्रक महादेव पालवे यांनी नवीन एसटी गाड्यांमुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
समिती सदस्य विजय मांडे यांनी आगार 1980 च्या दशकात सुरू झाल्याचे सांगत, मोठी जागा उपलब्ध असूनही अनेक इमारती नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आणले. त्यांचे नूतनीकरण झाल्यास आगाराचे स्वरूप पूर्णतः बदलू शकते, असे त्यांनी नमूद केले. प्रवासी प्रतिनिधी पुंडलिक भोईर यांनी आगारात आरक्षण सुविधा सुरू करण्याची मागणी केली.
