नेरळ-कळंब कामाची अधिकार्‍यांकडून पाहणी

। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ-कळंब राज्यमार्ग क्र.109 या रस्त्याच्या दर्जाबाबत सामाजिक कार्यकर्ते केशव बबन तरे यांनी समाजमाध्यमातून प्रत्यक्ष कामाचा पंचनामा करून त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला 18 जानेवारी 2022 रोजी निवेदन दिले होते. सदर निकृष्ठ दर्जाच्या कामाची त्वरीत अधिकारी वर्गाने पाहणी करून ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यावर शुक्रवारी बांधकाम विभागाचे अधिकारी वानखेडे यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली.
नेरळ-कळंब रस्त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदारास त्वरीत कामाचा दर्जा सुधारून उत्तम आणि विहित निविदेनुसार काम व्हावे अशी मागणी करण्यात आली होती. नाहीतर सदर काम दर्जाहीन असेल तर यावर त्वरीत काम बंद पाडले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते केशव तरे यांनी दिला होता. याची कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत सदर कामाची पाहणी करण्यासाठी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केली आणि या कामाची दुरूस्ती केली जाईल असे आश्‍वासन दहिवली चारफाटा येथे उपस्थित नागरीकांना दिले. यावेळी केशव तरे, गणेश तरे, अ‍ॅड.पंकज तरे, कृष्णा हाबळे, यशवंत तरे, देवेंद्र तरे, रवी पोहनकर, परेश तरे, संतोष घाटे, हरेश अगीवले महेश कालेकर भालचंद्र कडव, नीलेश भोईर आदी नागरीक आणि रिक्षाचालक उपस्थित होते.

Exit mobile version