निवडणूक निरीक्षकांकडून मतदान केंद्रांची पाहणी

| रायगड | वार्ताहर |

192 अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक (सा.) रुही खान यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील रोहा तालुक्यातील शेंडसई, महाळुंगे, भातसई, डोंगरी, चणेरा, आरे बुद्रुक, न्हावे, खैराले, खैरे खुर्द, खुटाळ मतदान केंद्राना भेटी देत पाहणी केली. मतदान केंद्रात अद्ययावत असणार्‍या सर्व भौतिक सुविधेची पाहणी करुन त्रुटींबाबत सूचनादेखील केल्या. त्याचप्रमाणे श्रीमती खान यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील आतापर्यंत 106 मतदार केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली आहे. याप्रसंगी त्यांचे संपर्क अधिकारी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रवींद्र शेळके आदी उपस्थित होते.

श्रीमती रुही खान यांनी मतदान केंद्रांवर निवडणूक भारत आयोगाच्या सूचनेप्रमाणे किमान आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची पाहणी केली. या केंद्रांबाहेर प्रकाशाची व्यवस्था करावी, असे सांगितले. प्रौढ, स्तनदा माता किंवा आवश्यकप्रमाणे बेंचेस, खुर्च्यांची व्यवस्था करावी, असे सांगितले. दिव्यांग व वृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर सुलभपणे जाता यावे, यासाठी रॅम्पची उभारणी करण्यात यावी. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मतदान केंद्रावर सुविधांची निर्मिती करण्यात यावी, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रावर सुरळीत प्रवेश, मार्गदर्शक सूचना, दिशादर्शक आणि सुरक्षा कर्मचार्‍यांची तैनाती याबाबत त्यांनी माहिती घेतली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version