शिवभक्तांची शासनाकडे मागणी
I महाड I प्रतिनिधी I
कोकणामध्ये दरवर्षी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होतो. अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडतात आणि त्यामध्ये जीवितहानीप्रमाणे वित्तहानीदेखील मोठ्या प्रमाणात होते. या विजेमुळे अनेक ऐतिहासिक वास्तुंचेदेखील नुकसान होत असल्याने किल्ले रायगडासह कोकणामध्ये असलेल्या पुरातन ऐतिहासिक वास्तुंचे विजेपासून संरक्षण करण्यासाठी शासनाने वीज प्रतिबंध यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी शिवभक्तांकडून केली जात आहे.
कोकणात पावसाचे प्रमाण अधिक असते. पावसाळ्यात वादळवारा आणि विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस कोसळतो. अतिवृष्टी होण्याची अधिक शक्यता असते. नैसर्गिक आपत्तीमुळे पुरातन वास्तुंचे नुकसान होऊ नये, याकरिता पुरातत्व विभागाकडून उपाय योजले जातात. यामध्ये गड-किल्ल्यावर असलेल्या वास्तुंचे संरक्षण करण्यासाठी वीज प्रतिबंधक यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. अनेक वास्तुंचे नुकसान वीज कोसळल्याने झाल्याचे आढळून आल्यामुळे किल्ले रायगडसह राज्यातील गड-किल्ल्यांवरील वास्तुंवर वीज प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी शिवभक्तांकडून केली जात आहे.