। अलिबाग । प्रतिनिधी ।
गणेशोत्सवानंतर रायगड जिल्ह्यामध्ये आता नवरात्रौत्सवाची धूम सुरु होणार आहे. नऊ दिवस वेगवेगळे धार्मिक, सांस्कृतिक, गरबा, सामाजिक उपक्रमांसह समाजप्रबोधनाचे कार्यक्रम मंडळामार्फत घेतले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये गुरुवारी (दि. 2) घटस्थापनेनंतर चार हजार 496 ठिकाणी घरोघरी घटस्थापना होणार आहे. त्यामध्ये एक हजार 336 ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना, तर तीन हजार 160 ठिकाणी प्रतिमा पूजनदेखील होणार आहे.
गणरायाची दीड, पाच, सात व दहा दिवस सेवा केल्यानंतर आता वेध नवरात्रौत्सवाचे लागले आहेत. गुरुवारी जिल्ह्यात मूर्तींसह प्रतिमा, घटांची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्ताने देवीच्या स्वागतासह सजावटीसाठी लागणारे पूजेचे व सजावटीचे साहित्य खरेदीसाठी महिलांनी बुधवारी सायंकाळी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी केली होती. झेंडूच्या फुलांसह सजावटीच्या साहित्यांनी जिल्ह्यातील बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. वेगवेगळ्या मंडळामार्फत वेगवेगळे कार्यक्रमदेखील घेतले जाणार आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, नऊ दिवस क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठीदेखील अनेक मंडळ सज्ज आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील हा उत्सव जल्लोषात साजरा करता यावा, यासाठी गावे, वाड्यांमधील मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ कामाला लागले आहेत. शहरी भागातदेखील तरुणाई, ज्येष्ठ मंडळांनी आपापल्या परीने योग्य पद्धतीने तयारी केली आहे. देवीची मूर्ती काहींनी आणून ठेवली, तर काही ठिकाणी मूर्ती गुरुवारी सकाळी आणली जाणार आहे.
रायगड पोलीस दलाच्या हद्दीत चार हजार 496 ठिकाणी प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामध्ये एक हजार 336 मूर्तींचा समावेश असून, एक हजार 143 सार्वजनिक व 193 खासगी ठिकाणी मूर्ती विराजमान होणार आहे. तसेच जिल्ह्यातील घट व प्रतिमांसह तीन हजार 160 ठिकाणी स्थापना केली जाणार आहे.