भरतऐवजी राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदार?

उद्यापासून भारत-द. आफ्रिकेमध्ये कसोटी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेला 26 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने रविवारी जोरदार सराव केला. या सरावात के.एस. भरतऐवजी के.एल. राहुल यष्टिरक्षणाचा सराव करताना दिसला. त्यामुळे पहिल्या कसोटीत भरतऐवजी राहुलकडे यष्टिरक्षकाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. रविवारी भारतीय संघाच्या यष्टिरक्षणाच्या सराव सत्रात के.एस. भरतचा समावेश नव्हता, मात्र के.एल. राहुल यष्टीरक्षण करताना दिसला. आता पहिल्या कसोटीसाठी राहुल सराव सत्रात सामील झाल्यानंतर रोहित शर्मा पहिल्या कसोटीत राहुलकडे के.एस. भरतच्या जागी यष्टिरक्षकाची जबाबदारी सोपवेल असे दिसते. काही काळापासून ऋषभ पंत आणि राहुलच्या दुखापतीमुळे के.एस. भरतची कसोटीत यष्टिरक्षणासाठी निवड केली जात होती.

के.एस. भरतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्याची संधी होती, मात्र तो फलंदाजीत अपयशी ठरला. इशान किशनलाही संधी होती, पण तोही अपयशी ठरला. ऋद्धिमान साहा संघातून बाहेर झाल्यानंतर संघ व्यवस्थापनाने के.एल. राहुलकडे यष्टिरक्षकाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, वेगवान गोलंदाजाची निवड करणे संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान, दोन वेगवान गोलंदाजांच्या स्थानासाठी तीन गोलंदाजांमध्ये चुरस आहे. जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार असून, त्याच्यासह मोहम्मद सिराजचे स्थान निश्‍चित आहे. दक्षिण आफ्रिकेतील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्या बघता भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. भारताकडे शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार आणि प्रसिध कृष्णासारखे वेगवान गोलंदाज आहेत. मात्र, या तिघांपैकी एकाची निवड करताना भारताच्या संघव्यवस्थापनाची ‘कसोटी’ लागणार आहे.

Exit mobile version