| माणगाव | प्रतिनिधी |
हवामानातील अनिश्चितता, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीचा फटका फळबागांना बसत असताना शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2026-27 अंतर्गत राबविण्यात येत आहे. संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई, अंजीर, नारळ आणि सुपारी या 12 फळपिकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. राज्यातील अधिसूचित क्षेत्रांमध्ये हवामान धोक्यांच्या निकषांनुसार ही योजना लागू करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विहित मुदतीत विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन माणगाव तालुका कृषी अधिकारी किरण पडवळकर यांनी केले आहे.
शेतीचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर हवामानावर अवलंबून असते. विशेषतः फळबागांच्या लागवडीपासून उत्पादन मिळेपर्यंत शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे हवामान आधारित फळ पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरू शकते. मात्र, योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केवळ विमा अर्ज करणे पुरेसे नसून, अधिसूचित पीक, उत्पादनक्षम फळबाग, आवश्यक कागदपत्रे आणि विहित अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्या साठी ऐच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिकांची लागवड करणारे शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. त्यामध्ये स्वतःच्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह कुळाने किंवा भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस आधी संबंधित बँकेला विहित नमुन्यात घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित शेतकरी योजनेत सहभागी असल्याचे गृहीत धरून नियमानुसार त्यांच्या कर्ज खात्यातून विमा हप्ता वजा केला जाऊ शकतो. योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांनीही आवश्यक घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करावे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनीदेखील योजनेच्या अटींनुसार सहभागाची प्रक्रिया पूर्ण करावी.
त्यासाठी जवळच्या ई-सेवा केंद्राशी, संबंधित बँकेशी किंवा विमा कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधून विमा योजनेतील अटी, लागू असलेली अंतिम मुदत आणि आवश्यक कागदपत्रांची खातर जमा करावी. हवामानातील बदलांमुळे फळबागांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी विमा योजनेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. ऐनवेळी कागदपत्रांची धावपळ टाळून वेळेत नोंदणी करावी आणि योजनेच्या नियमांची पूर्ण माहिती घेऊनच सहभाग निश्चित करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी किरण पडवळकर यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकातून केले आहे.
माणगावच्या फळबागांना विम्याचे कवच
