प्रमुख कार्यकर्त्यांना हकलण्याचा घाट

। मुंबई। प्रतिनिधी।

मतदानाच्या दिवशीच तुम्ही विरोधी पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना शहराबाहेर हाकलत असाल तर ते सहन केले जाणार नाही. असे म्हणत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी पदाधिकार्‍यांना आलेल्या नोटीसीचा फोटो देखील शेअर केला आहे.

या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, मुंब्रा आणि कळव्यातील काही कार्यकर्त्यांना पोलीस नोटीस देत आहेत की, मतदानाच्या दिवशी तुम्ही कळवा, मुंब्रा येथे थांबायचे नाही. पोलीस या नोटीसा कोणत्या कायद्यान्वये बजावत आहेत, हेच समजत नाही. लोकशाही मूल्यांची इतकी क्रूर हत्या यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. निवडणूक प्रक्रिया राबविताना निवडणूक शांततेत पार पडली पाहिजे, ही पोलिसांची जबाबदारी आहे अन् ती कार्यकर्त्यांचीही जबाबदारी आहे. पण, मतदानाच्या दिवशीच तुम्ही विरोधी पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना शहराबाहेर हाकलत असाल तर ते सहन केले जाणार नाही.

मोठमोठे गुन्हेगार, ज्यांच्यावर पाच-पाच खुनाचे गुन्हे दाखल आहेत, ते बाहेर उजळ माथ्याने फिरत आहेत. मात्र, ज्या कार्यकर्त्यांवर एकही गुन्हा नाही; जो कार्यकर्त्याची आपल्या कामामुळेच सबंध शहरभर ओळख आणि प्रतिष्ठा आहे, अशा कार्यकर्त्यांला नोटीस बजावून त्याला शहराबाहेर बाहेर हाकलत आहात. ही लोकशाहीची निर्घृण हत्या असून ती आम्ही शांतपणे सहन करणार नाही. उद्या जर आम्ही शहर बंदचा निर्णय घेतला तर त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल!

Exit mobile version