ब्रिजभूषण यांच्या अटकेवर ठाम
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत सुरू असलेले आंदोलन जंतरमंतरवरून रामलीला मैदानावर हलविण्याच्या आणि आंदोलानाला राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप देण्याच्या सूचना आंदोलनाच्या 24व्या दिवशी एका संघटनेच्या वतीने समोर आल्या आहेत. 21 मे नंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. तसेच यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात असा इशारा कुस्तीपटूंकडून देण्यात आला आहे.
आंदोलक कुस्तिगीरांच्या भूमिकेला पाठिंबा देत भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी आता या आंदोलनाला राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप यायला हवे, अशी सूचना केली. आझाद यांच्या सूचनेचा आम्ही जरूर विचार करून आंदोलनाचा ठिय्या रामलीला मैदानावर नेण्याविषयी लवकरच निर्णय घेऊ, असे साक्षी मलिकने सांगितले. आझाद सोमवारी संध्याकाळी आंदोलकांची भेट घेण्यास आले होते. मात्र, त्यांना रात्री तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर आझाद आपल्या अनुयायांसह मंगळवारी सकाळी पुन्हा आंदोलन स्थळी दाखल झाले. त्या वेळेस त्यांनी हे आंदोलन आता राम लीला मैदानावर हलविण्याचे आवाहन कुस्तिगीरांना केले.
कुस्तिगिरांनी यावर थेट भाष्य केले नाही. मात्र, विनेशने आम्हाला जंतरमंतरवर एका बाजूला नेण्यात येत असून, काही वेळा कुस्तीपटूंना मारहाण केली जात असल्याचाही आरोप केला. कुस्तिगीरांनी आंदोलनाचा पवित्रा आता आक्रमक केला असल्याचे दिसून येत आहे. अधिकाअधिक लोकांशी संपर्क साधण्यासाठी आणि ब्रीजभूषण यांच्या छळाची जाणीव करून देण्यासाठी कुस्तिगीरांनी कॅनॉट प्लेस येथे मोर्चाही काढला होता. आता आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने कुस्तीपटू 21 मे रोजीच निर्णय घेतील, असे सांगितले जात आहे.